के. चंद्रशेखर राव यांच्या कॅबिनेटमध्ये फक्त दोन मंत्री
हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दोन आठवडे उलटलेत. पण अजूनही त्यांनी मंत्रीमंडळ विस्तार केलेला नाही. त्यांच्या कॅबिनेटमध्ये केवळ दोनच मंत्री आहेत. अजूनही केवळ दोनच मंत्री का? असा सवाल आता विरोधात असलेल्या भाजप आणि काँग्रेसने केला आहे. जनतेच्या या प्रश्नाचं सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) उत्तर द्यावं, अशी मागणी विरोधकांनी […]
हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दोन आठवडे उलटलेत. पण अजूनही त्यांनी मंत्रीमंडळ विस्तार केलेला नाही. त्यांच्या कॅबिनेटमध्ये केवळ दोनच मंत्री आहेत. अजूनही केवळ दोनच मंत्री का? असा सवाल आता विरोधात असलेल्या भाजप आणि काँग्रेसने केला आहे. जनतेच्या या प्रश्नाचं सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) उत्तर द्यावं, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत केसीआर यांनी स्पष्ट बहुमत मिळवलं. 119 पैकी तब्बल 88 जागा टीआरएसने जिंकल्या. त्यानंतर 13 डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. केसीआर यांच्यासोबत फक्त गृह मंत्र्याने शपथ घेतली होती. खातेवाटप लवकरच केलं जाईल, असं त्यांनी शपथविधीनंतर सांगितलं होतं. वाचा – तेलंगणात ओवेसींच्या भावाचा निकाल लागला!
काँग्रेस आणि भाजपचा टीआरएसवर निशाणा
निवडणुका संपल्या आहेत. केसीआर यांनी दिलेली मुदत संपली आहे. लोकांनी टीआरएसला स्पष्ट बहुमत दिलंय. तरीही मंत्रीमंडळाची स्थापना अजून झालेली नाही. टीआरएस नेमकी कशाची वाट पाहत आहे, असा सवाल भाजपचे तेलंगणा अध्यक्ष के. लक्ष्मण यांनी ‘एएनआय’शी बोलताना केलाय. निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधीही अजून झाला नसल्याचा आरोप भाजपने केलाय.
केसीआर यांनी तेलंगणाचं प्रशासन वाऱ्यावर सोडलंय आणि फेडरल फ्रंटसाठी ते दौरे करत आहेत, असंही लक्ष्मण यांनी म्हटलंय. केसीआर यांनी तिसरी आघाडी उघडण्यासाठी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. वाचा – लोकसभा निवडणुकीत केसीआर काँग्रेसप्रणित महाआघाडीचा खेळ बिघडवणार?
दुसरीकडे काँग्रेसनेही मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केलीय. तेलंगणाच्या जनतेने टीआरएसला स्पष्ट बहुमत दिलंय. पण खातेवाटप सोडून केसीआर तिसऱ्या आघाडीच्या कामाला लागले आहेत. बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप आघाडी करायची असल्याचं ते म्हणतात, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटतात, असा आरोप काँग्रेसचे नेते हनुमंत राव यांनी केलाय.
टीआरएसचं स्पष्टीकरण
टीआरएसच्या नेत्यांनीही या आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय. मुख्यमंत्र्यांकडून खातेवाटप प्रक्रियेवर काम सुरु आहे. लवकरच प्रभावी मंत्रीपरिषदेची नियुक्ती केली जाईल, जी राज्याच्या विकासासाठी तत्पर असेल, असं स्पष्टीकरण टीआरएसचे नेते अबिद रसूल यांनी दिलंय.