ईव्हीएमवर शंका, काँग्रेसचा ‘हा’ दिग्गज नेता निवडणूक रिंगणातून बाहेर
बुलडाण्याच्या खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा (Ex mla dilip kumar sananda not contest election) यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
बुलडाणा : बुलडाण्याच्या खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा (Ex mla dilip kumar sananda not contest election) यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दोन महिन्यांपूर्वीच कल्पना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ईव्हीएमच्या मुद्यावर निवडणुकीतूनच माघार घेण्याची भूमिका घेणारे सानंदा (Ex mla dilip kumar sananda not contest election) हे राज्यातील पहिलेच उमेदवार असावेत. मात्र सानंदा यांनी खामगाव मतदारसंघातून माघार घेतल्यामुळे भाजपचये संभाव्य उमेदवार आमदार आकाश फुंडकर यांना ही निवडणूक सोपी झाल्याचे दिसत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी विधानसभा निवडणुकीतून अधिकृतरित्या माघार घेतली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीतच त्यांच्या नावाची घोषणा होणार होती. मात्र त्यांनी पक्षश्रेष्ठींना भेटून ईव्हीएमवर शंका असल्यामुळे मी निवडणूक लढणार नसल्याचे पक्षाला कळवलं आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणासह खामगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे.
सानंदांनी खामगाव मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह होता. मात्र दोन महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय घेतला असल्याचे मी सांगितले होते, असा दावा त्यांनी केला. ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे पहिल्या यादीतच माझ्या नावाचा समावेश होण्याची शक्यता होती. मात्र 28 सप्टेंबरला दुपारी मुकुल वासनिक आणि बाळासाहेब थोरात यांना मी निर्णयावर ठाम असल्याचे लेखी पत्र देऊन दूरध्वनीवरुनही कळविले होते, असंही सानंदा म्हणाले.
विशेष म्हणजे याबाबत त्यांनी रात्री उशिरा प्रसिद्धी पत्रकही काढले असून त्यामध्ये निवडणूक न लढविण्याबाबतची कारणे नमूद केली आहेत. मागील आठवड्यात खामगावात त्यांनीच आयोजित केलेल्या मेळाव्यात गैरहजर राहून तसे संकेतही दिले होते. सानंदा हे निवडणूक लढण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे गेल्या आठवड्यात समोर आले होते. त्यांनी खामगावात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला, मात्र तेच मेळाव्याला हजर नव्हते. मुलाच्या आजारपणामुळे त्यांना मुंबईला जावे लागले होते, असं त्यानी सांगितलं होते.