अर्थसंकल्प सादर करताना इंदिरा गांधी यांनी मागितली माफी? काय कारण होते?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आधी 1970 मध्ये अर्थसंकल्प सादर करून इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या होत्या. हा त्यांचा पहिला आणि शेवटचा अर्थसंकल्प होता. मात्र, अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी त्यांनी माफी मागितली होती.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी 2024-25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सलग सातवा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरणार आहेत. मात्र, सीतारामन यांच्या आधी 1970 मध्ये अर्थसंकल्प सादर करून पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा बहुमान इंदिरा गांधी यांना मिळाला होता. त्यांच्यानंतर निर्मला सीतारामन या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री झाल्या. इंदिरा गांधी यांचा 1970 चा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी ऐतिहासिक होता. परंतु, अर्थसंकल्प सादर करताना इंदिरा गांधी यांनी माफी मागितली होती. त्याचे कारण जाणून घेऊ.
इंदिरा गांधी यांचे सरकार सत्तेत होते. उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याकडे अर्थमंत्रालय होते. पण, इंदिरा गांधी यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यामुळे मोरारजी देसाई यांनी बंड केले. त्यामुळे काँग्रेसने 12 नोव्हेंबर 1969 रोजी मोरारजी यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यामुळे अर्थमंत्री पद रिक्त झाले. इंदिरा गांधी यांनी या मंत्रालयाचे काम हाती घेतले. 28 फेब्रुवारी 1970 रोजी त्यांनी पहिल्यांदा आणि शेवटचा अर्थसंकल्प सादर केला.
सध्या लोकसभेत सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर होतो. मात्र, इंदिरा गांधी यांच्या काळात अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर होत असे. त्यानुसार 28 फेब्रुवारी 1970 रोजी संध्याकाळी 5 वाजता इंदिरा गांधी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत उभ्या होत्या. सदस्यांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांनी अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली. अर्थसंकल्प वाचत असताना इंदिरा गांधी मध्येच म्हणाल्या, ‘मला माफ करा.’ त्याचे हे वाक्य ऐकताच सभागृहात शांतता पसरली. त्यानंतर इंदिरा गांधी हसल्या आणि म्हणाल्या, ‘मला माफ करा. यावेळी मी सिगारेट ओढणाऱ्यांच्या खिशावर बोजा टाकणार आहे.’
इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्पामध्ये महसूल वाढवण्याची योजना आखली होती. यासाठी त्यांनी सिगारेटवरील कर सुमारे 7 पटीने वाढवला होता. जो कर पूर्वी 3% होता तो वाढवून त्यांनी तब्बल 22 टक्के इतका केला. तर, 10 सिगारेट असणाऱ्या स्वस्त प्रकारच्या सिगारेटच्या किमतीत त्यांनी दोन पैशांनी वाढ केली होती.
कर वाढवला पण विरोध झाला नाही
सरकार जेव्हा कर वाढवते तेव्हा विरोधक त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध करतात. मात्र, यावेळी तसे झाले नाही. कारण, त्यावेळी फक्त पैसेवाले लोकच सिगारेट ओढत. गरिबांमध्ये त्याचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे सिगारेटवरील कर वाढविला तरी त्याला विरोध झाला नाही. सिगारेटवरील कर वाढवताना त्या म्हणाल्या, ‘सिगारेटवरील कर वाढवल्याने सरकारला 13.50 कोटी रुपयांचा अतिरिक्त कर मिळणार आहे. या अर्थसंकल्पामधून इंदिराजींनी गरिबी निर्मूलनाशी संबंधित अनेक योजना जाहीर केल्या होत्या.
या निर्णयांमुळे अर्थसंकल्प लोकप्रिय झाला
इंदिरा गांधी यांचा 1970 चा अर्थसंकल्प इतर अनेक ऐतिहासिक निर्णयांसाठी ओळखला जातो. या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच कृषी संबंधित योजनांसाठी 39 कोटी रुपये देण्यात आले. तर, निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 40 रुपयांची वाढ करण्यात आली होती. प्रत्येक गरीब कुटुंबाला घर देण्याची महत्त्वाकांक्षी योजना याच अर्थसंकल्पातूनच सुरू झाली होती. नगरविकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली होती. यासारख्या लोकप्रिय घोषणांमुळे हा अर्थसंकल्प लोकप्रिय झाला होता.