प्रेमासाठी 9 वर्षे वाट पाहिली, अटलजींमुळे बॉलिवूडमधली एन्ट्री थांबली, भाजप नेत्याची रंजक प्रेमकहाणी
BJP Leader Love Story : भाजपच्या या दिग्गज नेत्याची प्रेमकहाणी फिल्मी कथेपेक्षा काही कमी नाही. बस प्रवासापासून सुरु झालेली ही प्रेमकहाणी अखेर 9 वर्षांनंतर यशस्वी झाली. या नेत्याचा राजकीय प्रवास जसा रंजक आहे. त्याचप्रमाणे त्यांची प्रेमकथा आणि लग्नाची गोष्टही अतिशय रंजक आहे.
नवी दिल्ली : बिहार राज्यातील सुपौल येथील विल्यम्स स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी तो युवक दिल्लीला आला. दिल्लीच्या पुसा कृषी महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. कॉलेजला जाण्यासाठी दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) बसने तो प्रवास करायचा. याच बसमधून एक सुंदर मुलगी प्रवास करत असे. पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. काही दिवस ती मुलगी गायब झाली पण त्याचे डोळे तिला शोधतच होते. एकदा पुन्हा त्याल ती तरुणी बसमध्ये दिसली. तिला बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही. तेव्हा त्याने आपली जागा तिला देऊ केली. त्या दोघांमध्ये संवाद सुरु झाला. एक दिवस तो थेट तिच्या घरी गेला. त्या मुलीच्या कुटुंबाला भेटला. पण. लग्नाविषयी काही बोलण्याचे धाडस मात्र त्याला जमले नाही. वेळ पाहून त्याने आपल्या मनातील भावना तिच्याकडे व्यक्त केल्या. ती रागावली कारण दोघांचे धर्म वेगळे होते. पण त्याने प्रयत्न सोडले नाही. त्याच्या प्रेमापुढे नतमस्तक होऊन तिने लग्नाला होकार दिला. 9 वर्षांच्या प्रेमकथेला अखेर गंतव्यस्थान मिळाले. या प्रेमकथेचे नायक आणि नायिका म्हणजे भाजप नेते शाहनवाज हुसेन आणि त्यांची पत्नी रेणू शर्मा हुसेन…
बिहारमधील सुपौल येथे सय्यद नासिर हुसेन आणि नसिमा खातून यांच्या घरी 12 डिसेंबर 1968 रोजी शाहनवाझ यांचा जन्म झाला. शाहनवाझ यांनी सुपौल येथून बीएसएसई तर आयटीआय, पुसा, दिल्ली येथून अभियांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स) मध्ये डिप्लोमा केला आहे. याच काळात यांची ही प्रेमकहाणी सुरु झाली. अखेर 9 वर्षांनंतर 12 डिसेंबर 1994 रोजी त्यांनी रेणू शर्मा यांच्याशी लग्न केले.
सय्यद शाहनवाझ हुसैन यांनी भाजपच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. हुसेन यांनी 1999 मध्ये किशनगंज मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीत ते जिंकूले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यमंत्री म्हणून त्यांनी अन्न प्रक्रिया उद्योग, युवा घडामोडी, क्रीडा आणि मानव संसाधन विकास यासारखी विविध खाती सांभाळली. 2001 मध्ये त्यांना कोळसा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला. तर, सप्टेंबर 2001 मध्ये नागरी विमान वाहतूक पोर्टफोलिओसह कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती देण्यात आली. भारत सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री अशी त्यांची ओळख बनली. नंतर 2003 ते 2004 या काळात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून वस्त्रोद्योग खात्याची जबाबदारी सांभाळली.
2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. परंतु, नोव्हेंबर 2006 मध्ये बिहारमधील भागलपूर मतदारसंघाची रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत जिंकून त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश केला. 2009 च्या निवडणुकीत त्यांनी भागलपूरमधून पुन्हा विजय मिळविला. 2014 मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला.
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री असताना शाहनवाज हुसैन यांना बॉलिवूडमधून ऑफर आली होती. याबाबत त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना सांगितले. अटलजी यांनी त्यांना ‘ते एक राजकारणी आहेत. अभिनेता नाही. त्यांनी फिल्मी दुनियेत जाण्याचा निर्णय सोडून द्यावा.’ असे सांगत बॉलिवूडमध्ये जाण्यापासून रोखले होते.