Santosh Bangar : आमदार संतोष बांगर यांची शिवसेनेतून हकालपट्टी, बंडखोरीनंतर मोठी कारवाई
बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केले, तेव्हा बांगर हे शिवसेनेमध्येच होते. बंडखोर आमदारांनी पुन्हा शिवसेनेत यावे असे आवाहान देखील त्यांनी केले होते. मात्र बहुमत चाचणीच्या दिवशीच ते एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले.
मुंबई: हिंगोलीमधून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बंडखोर आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांची शिवसेनेतून (shivsena) हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केले तेव्हा बांगर हे शिवसेनेमध्येच होते. बंडखोर आमदारांनी पुन्हा शिवसेनेत यावे असे आवाहान देखील त्यांनी केले होते. मात्र बहुमत चाचणीच्या दिवशीच ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटला जाऊन मिळाले. संतोष बांगर यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्यावेळी शिवसेनेच्या बाजुने मतदान केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी बहुमत चाचणीच्या अवघ्या काही तास आधी ते शिंदे गटाला येऊन मिळाले. बहुमत चाचणीत त्यांनी शिंदे गटाच्या बाजूने मतदान केले होते. याची गंभीर दखल आता शिवसेनेकडून घेण्यात आली असून, संतोष बांगर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
बहुमत चाचणीच्या दिवशी शिंदे गटाला पाठिंबा
दरम्यान असे काय झाले की सुरुवातीला शिवसेनेसोबत असलेले संतोष बागर हे बंडाच्या तब्बल तेरा दिवसांनंतर शिंदे गटात सहभागी झाले. यावर प्रतिक्रिया देताना संतोष बांगर यांनी म्हटले होते की, मी माझ्या मतदार संघातील लोकांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांशी चर्चा केली, त्यांचा सल्ला घेतला. सर्वांचे म्हणणे एकच होते की, राज्यात सध्या बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा हिंदुत्त्ववादी विचारांचा मुख्यमंत्री होत आहे. त्यामुळे तुम्ही देखील शिंदे गटात सहभागी व्हा. कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे आपण शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे संतोष बांगर यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास मातोश्रीवर जाऊ असेही बांगर यांनी म्हटल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते. पक्षाविरोधी कारवायाचा ठपका ठेवत त्यांची शिवसेनेमधून हाकालपट्टी करण्यात आली आहे.
बंडखोरीनंतर संतोष बांगर यांचा व्हिडीओ व्हायरल
सुरुवातीला संतोष बांगर हे शिवसेनेसोबतच होते. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर तब्बल तेरा दिवसांनी ते शिंदे गटात सहभागी झाले. दरम्यान बांगर जेव्हा शिवसेनेते होते. त्यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला होता. बंडखोर आमदारांच्या बायका तरी त्यांच्यावर विश्वास ठेवतील का असा सवाल त्यांनी केला होता. त्यांच्या बायकांना देखील असेच वाटत असेल की, आज याने ज्या पक्षाच्या जीवावर मोठा झाला त्या पक्षाला सोडले, मला तर कधीही सोडू शकतो अशी घणाघाती टीका त्यांनी केली होती. मात्र ते जेव्हा शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात आले तेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला. शिवसेनेकडून देखील त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.