मुसळधार पावसात हजारो शेतकऱ्यांचा कोल्हापुरात मोर्चा; शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान द्या, राजू शेट्टी आक्रमक
शेट्टी यांनी एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चामध्ये भर पावसात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. दसरा चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारनं नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याच्या मागणीसाठी राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज हजारो शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी कोल्हापुरात (Kolhapur) मुसळधार पाऊस सुरु होता, त्याचवेळी शेट्टींच्या नेतृत्वात शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्यावेळी शेट्टी यांनी एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चामध्ये भर पावसात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. दसरा चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
1 जुलैपासून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असताना नवीन सरकारने त्याला दिलेल्या स्थगितीवर जोरदार टीका केली. तुमचा सत्तेचा खेळ शेतकऱ्यांच्या हिताच्या आड येऊ देऊ नका, असं आवाहन शेट्टी यांनी सरकारला केलंय. शेतकऱ्यांच्या खात्यात विनाअट पैसे वर्ग करण्यासाठी राजू शेट्टी यांनी 9 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. या काळात पैसे जमा न झाल्यास 9 जुलैला पुणे बंगळुरु महामार्ग बेमुदत काळासाठी रोखणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिलाय. दरम्यान उद्या न्यायालयीन कामासाठी मुंबईला जाणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी देखील प्रयत्न करणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात यावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केलीय. हा मोर्चा एकट्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. आपली मागणी मान्य झाली नाही तर राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा शेट्टी यांनी केलाय.
मुख्यमंत्री महोदय नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांच्या खात्यावर १ जुलै पासून पैसे जमा होणार होते त्याला स्थगिती का दिली ? असच ट्वीट आधीच्या मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केले होते पण अखेर भ्रमनिरासच झाला शेतक-याचा विश्वास बसण्यासाठी ट्वीट करण्यापेक्षा शासन निर्णय
— Raju Shetti (@rajushetti) July 12, 2022
ठाकरे सरकारचा निर्णय काय?
पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार होता. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत हा लाभ मिळेल. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मान्यता देण्यात आली होती. यासाठी 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येईल. 2017-18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णत: परतफेड करणं आवश्यक आहे. 2018-19 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असावे. तसेच 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड करणाऱ्यांना हा लाभ मिळेल. 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार होती.