वडील एका आठवड्यात भाजपात प्रवेश करतील : सुजय विखे पाटील
अहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी अमेठीतून दणदणीत विजय मिळवलाय. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यावर त्यांनी मात केली. आता वडील राधाकृष्ण विखे पाटील एका आठवड्यात भाजपात येतील, असा खुलासा सुजय यांनी केलाय. विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. आता खुद्द मुलानेच वडिलांच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब केलंय. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विजय […]
अहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी अमेठीतून दणदणीत विजय मिळवलाय. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यावर त्यांनी मात केली. आता वडील राधाकृष्ण विखे पाटील एका आठवड्यात भाजपात येतील, असा खुलासा सुजय यांनी केलाय. विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. आता खुद्द मुलानेच वडिलांच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब केलंय.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विजय हा जनतेबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांचाही विजय आहे. या विजयाने 1991 मध्ये आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांची आठवण झाली. या विजयानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करावं असं मी आवाहन केलं आहे. त्यामुळे ते एका आठवड्यात भाजपात प्रवेश करतील, अशी माहिती सुजय विखे पाटील यांनी टीव्ही 9 ला दिली.
सुजय विखे पाटलांच्या विजयानंतर नगर जिल्ह्यात जल्लोष करण्यात आला. लोकसभा निवडणुकीपूर्वी सुजय यांनी भाजपात प्रवेश केला होता. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्येच असल्यामुळे त्यांना मुलाचा जाहीर प्रचार करता आला नाही. पण सर्व स्तरावर सुजय यांना कसं मतदान होईल याची विखे पाटलांनी पूर्ण काळजी घेतली. त्यामुळेच मोठ्या फरकाने त्यांनी विजय मिळवला.
सुजय विखे यांना एकूण 58 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे 695917 मतं मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी संग्राम जगताप यांना 419029 मते मिळाली. म्हणजेच 276888 मतांनी सुजय विखे यांनी विजय मिळवला. नगरमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होईल असा अंदाज लावला जात होता. पण पहिल्या फेरीपासून सुजय विखेंनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली.