उद्धव ठाकरेंच्या आधी पाच मुख्यमंत्र्यांनी मुलाला दिलं कॅबिनेट मंत्रिपद!
करुणानिधी आणि प्रकाशसिंग बादल यांनी तर आपल्या मुलांना थेट उपमुख्यमंत्रिपद दिलं होतं.
मुंबई : आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यामुळे पिता मुख्यमंत्री आणि पुत्र मंत्री असं उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच घडलं, तरी देशात याआधी सात वेळा असे योग ‘जुळून’ आले आहेत. पंजाब, तेलंगणा, काश्मिर, हरियाणा आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये पाच मुख्यमंत्र्यांनी सात वेळा आपल्या मुलांना मंत्रिपद (Father Son Cabinet Ministry) दिलं आहे.
आदित्य ठाकरे यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. आदित्य यांना कुठले खाते मिळणार याचीही उत्कंठा आहे. आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या मुलाला प्रत्येकी दोन वेळा मंत्री केलं. करुणानिधी आणि प्रकाशसिंग बादल यांनी तर आपल्या मुलांना थेट उपमुख्यमंत्रिपद दिलं होतं.
जम्मू काश्मीर : शेख अब्दुल्ला-फारुक अब्दुल्ला – 1982 मध्ये शेख अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. त्याच वर्षी त्यांनी आपले पुत्र फारुक अब्दुल्ला यांना विधानसभा निवडणुकीत उतरवलं. त्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्रालयाची धुरा दिली.
हरियाणा : देवीलाल-रणजीत – 1987 मध्ये चौधरी देवीलाल दुसऱ्यांदा हरियाणाचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पुत्र रणजीत सिंह चौटाला यांच्याकडे कृषिमंत्रालयाची जबाबदारी दिली. रणजीत सिंह सध्या खट्टर कॅबिनेटमध्ये ऊर्जामंत्री आहेत.
तामिळनाडू : करुणानिधी-एमके स्टॅलिन – 2006 मध्ये करुणानिधी पाचव्यांदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पुत्र एमके स्टॅलिन यांना ग्रामविकास आणि पंचायतीराज मंत्रिपद दिलं. मे 2009 मध्ये तर करुणानिधींनी मुलाला उपमुख्यमंत्रिपद दिलं होतं. अशाप्रकारे दोन वेळा स्टॅलिन यांना वडिलांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं.
पंजाब : प्रकाश सिंह बादल-सुखबीर सिंह बादल – 2007 मध्ये प्रकाश सिंह बादल चौथ्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी 2009 मध्ये मुलगा सुखबीर सिंह बादल यांना उपमुख्यमंत्री केलं. 2012 मध्ये अकाली दल पुन्हा सत्तेत आलं, तेव्हा तामिळनाडूप्रमाणेच वडील मुख्यमंत्री- मुलगा उपमुख्यमंत्री असा योग जुळून आला.
तेलंगणा : केसीआर-केटीआर – 2014 मध्ये चंद्रशेखर राव तेलंगणाचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पुत्र केटी रामाराव यांना आयटी मंत्रालयासह अनेक विभागांची जबाबदारी दिली. 2018 मध्ये चंद्रशेखर राव पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर केटी रामाराव पुन्हा मंत्री झाले.
Father Son Cabinet Ministry