हिंमत असेल तर राजीव गांधींच्या मान-सन्मानावर निवडणूक लढवा : पंतप्रधान मोदी
रांची : हिंमत असेल तर उरलेल्या दोन टप्प्यांची निवडणूक दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा मान-सन्मान आणि बोफोर्सच्या मुद्द्यावर लढवून दाखवा, असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि यूपीएतील पक्षांना दिलंय. कुणात किती दम आहे ते यातून कळेल, असंही मोदी म्हणाले. झारखंडमधील सभेत ते बोलत होते. काँग्रेस, नामदाराच्या परिवाराच्या दरबारातील चमचे यांना आव्हान देतो, आजचा टप्पा […]
रांची : हिंमत असेल तर उरलेल्या दोन टप्प्यांची निवडणूक दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा मान-सन्मान आणि बोफोर्सच्या मुद्द्यावर लढवून दाखवा, असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि यूपीएतील पक्षांना दिलंय. कुणात किती दम आहे ते यातून कळेल, असंही मोदी म्हणाले. झारखंडमधील सभेत ते बोलत होते. काँग्रेस, नामदाराच्या परिवाराच्या दरबारातील चमचे यांना आव्हान देतो, आजचा टप्पा तर पूर्ण झालाय, पण अजून दोन टप्प्यांचं मतदान बाकी आहे. तुमचे माजी पंतप्रधान, ज्यांच्यासाठी अश्रू गाळत आहात, त्यांच्या मान-सन्मानाच्या मुद्द्यावर उरलेले दोन टप्पे लढवून दाखवा, असं आव्हान मोदींनी दिलं.
तुमच्यात हिंमत असेल तर उरलेल्या दोन टप्प्यात दिल्लीची निवडणूकही बोफोर्सच्या मुद्द्यावर लढवून दाखवा. नामदाराचं कुटुंब पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा विसरलंय. पंतप्रधानालाच शिव्या दिल्या जात आहेत. मी एका सभेत बोफोर्स भ्रष्टाचाराची आठवण करुन दिली आणि वादळ आलं. मी तर एकच शब्द वापरला होता, पण विंचू चावल्यासारखं करत आहेत, असं मोदी म्हणाले. विसाव्या शतकात एका कुटुंबाने कशा पद्धतीने देशाला लुटलंय हे नवीन पिढीलाही समजायला हवं, असं ते म्हणाले.
काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांनी यूपीएतील मित्रपक्षांनाही आव्हान दिलं. माझ्या सरकारवर गेल्या पाच वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. त्यामुळे विरोधकांचा तिळपापड झालाय, कारण त्यांच्या हातात मुद्देच राहिलेले नाहीत. झारखंडमध्येही भाजपच्या नेतृत्त्वात भ्रष्टाचारमुक्त सरकारची स्थापना केली आणि आज विकासाची लाट आली आहे, असं म्हणत झारखंडमधील घोटाळ्यांचाही मोदींनी उल्लेख केला.
उत्तर प्रदेशातील एका सभेत मोदींनी राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन असा उल्लेख केला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधताना ते म्हणाले होते की, तुमच्या वडिलांना राज दरबारींनी गाजावाजा करत मिस्टर क्लीन बनवलं. पण पाहता पाहता भ्रष्टाचारी नंबर वन म्हणून त्यांचं जीवन संपलं. नामदार हा अंहकार तुम्हाला संपवून टाकेल. हे देश चुका माफ करतो, पण धोका कधीही माफ करत नाही, असा हल्लाबोल मोदींनी केला होता.