उस्मानाबादमध्ये अमित शाहांची सभा, बॅनरवरून शिवसेना खासदार गायब, पद्मसिंह पाटलांना मानाचं स्थान
शिवसेना-भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युती (Fight in Shivsena BJP in Osmanabad) केलेली आहे. मात्र, तरी दोन्ही पक्षांमधील सुप्त संघर्ष वारंवार पाहायला मिळत आहे.
उस्मानाबाद : शिवसेना-भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युती (Fight in Shivsena BJP in Osmanabad) केलेली आहे. मात्र, तरी दोन्ही पक्षांमधील सुप्त संघर्ष वारंवार पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह (Amit Shah in Osmanabad) यांच्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा होत आहेत. त्याची जय्यत तयारीही केली जात आहे. मात्र, उस्मानाबादमधील सभेच्या बॅनरवर शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना स्थानच देण्यात आलेलं नाही. दुसरीकडे खुनाचे गंभीर असणाऱ्या डॉ. पद्मसिंह पाटलांना बॅनरवर मानाचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात युती असली तरी उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र निंबाळकर आणि पाटील परिवारातील संघर्षाने वातावरण चिघळले आहे.
उस्मानाबाद येथील अमित शाह यांच्या सभेसाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, या बॅनरवर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना स्थानच देण्यात आलेलं नाही. त्यामुळे निंबाळकर समर्थकांमध्ये चांगलीच नाराजी आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या कुरघोडीचा किती परिणाम निकालावर होणार याविषयी देखील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.
विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार निंबाळकर हे बॅनरवरुन गायब असले तरी भाजपच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांना बॅनरवर मानाचे स्थान देण्यात आलं आहे. पद्मसिंह पाटलांवर खुनाच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अशा स्थितीत राज्यात युती असतानाही शिवसेना-भाजपमधील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. राणाजगजितसिंह पाटील यांनी मात्र कोणताही वाद नाही, सर्व काही ठीक होईल, काळजी करू नका, असं म्हटलं आहे.
राणा पाटील यांनी सोलापूर येथील सभेत भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र त्या सोहळ्यास डॉ. पद्मसिंह पाटील गैरहजर होते. डॉ. पाटील यांच्यावर खुनाचे गंभीर आरोप असल्यानं त्यांना सोलापूर येथे केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या सभेच्या मंचावर येऊ दिले नाही, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली होती. त्यावर डॉ. पाटील यांनी आपण सक्रिय राजकारणापासून अलिप्त असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. डॉ. पाटील सोलापूर येथील सभेस हजर नसल्याने त्यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, भाजपच्या बॅनरवर त्यांचा फोटो असल्याने ते भाजपमध्येच असल्याचं बोललं जात आहे.
पवनराजे हत्याकांडात सीबीआयने पदमसिंह पाटील यांना अटक केल्यानंतर पाटील आणि राजेनिंबाळकर परिवारात सत्ता संघर्ष सुरू आहे. या दोन्ही परिवाराने निवडणुकीत एकमेकांचा पराभव केला आहे. नुकताच लोकसभेत राणा पाटील यांचा पराभव करून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर खासदार झाले आहेत. राणा हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून नशीब आजमावत आहेत.
या संपूर्ण घडामोडींवर बोलताना शिवसेना खासदार निंबाळकर म्हणाले, “भाजपला विरोध नाही. मात्र, या प्रवृत्तीला विरोध आहे. राणा कुठेही उभे राहिले तरी जनता त्यांचा पराभव करेल.” यानंतर राणा यांची पाठराखण करत भाजपने निंबाळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच यापुढे जशाच तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला.
भाजपच्या आजच्या सभास्थळी राष्टीय समाज पक्ष, रिपाइंसह इतर पक्षांचे झेंडेही आहेत. मात्र, शिवसेनेचा येथे एकही झेंडा नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे उस्मानाबादमधील युतीच्या संघार्षाची चांगलीच चर्चा होत आहे.