Gunratna Sadavarte Satara Police: अखेर सातारा पोलीसांकडे गुणरत्न सदावर्तेंचा ताबा, चौकशीसाठी घेऊन गेले
गुणरत्न सदावर्तेंना घेऊन सातारा पोलिस साताऱ्याकडे रवाना
मुंबई – साताऱ्यामध्ये गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्यावरती एक गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षणाच्याबाबत एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं होतं. या अनुशंगाने गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती सातारा शहर पोलिस ठाण्यात (Satara Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. साधारण दीड वर्षापुर्वी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल झालेल्या तक्रारीवरती अद्याप सातारा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. सातारा पोलिसांनी चौकशीसाठी सरकारकडे ताबा मागितला होता. सरकारच्या मंजूरीनंतर चौकशीसाठी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तब्ब्ल 60 ते 70 पोलिसांच्या बंदोबस्तात सदावर्ते साताऱ्यात घेऊन जात आहेत. साधारण चारवाजेपर्यंत पोलिसांचा ताफा साताऱ्यात पोहोचेल.
आंदोलकांना भडकविल्याचा आरोप
एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केल्यापासून गुणरत्न सदावर्ते अधिक चर्चेत आहेत. मागील पाच महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी आपल्या मागण्यांवरती ठाम आहे. हे आंदोलन राज्यभरात सुरू असून त्याचा एसटीला चांगलाचं अर्थिक फटका बसला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. परंतु राज्य शासनात आमचं तात्काळ विलीनीकरण व्हावं या मागणीसाठी कर्मचारी हटून बसले आहेत. काही एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावरती हल्ला केला. आंदोलकांना भडकवणे, कट रचणे, सरकारी कामात अडथळा आणणे या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. सदावर्ते यांना ताब्यात घेतल्यानंतर चार दिवस पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं
आठ एप्रिलला गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी त्यांना कोर्टात हजर केले असता, सुरूवातीचे चार त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच काल त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आज सकाळी गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यात आला. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या वादग्रस्त विधानाविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने सगळ्यांचे लक्ष आता सातारा पोलिसांकडे लागले आहे.