Loksabha Election 2024 | इतिहासात पहिल्यांदाच ‘गांधी’ घराणे कॉंग्रेसला मतदान करणार नाही? ‘या’ पक्षाने बिघडवले गणित
नवी दिल्लीमधून सोमनाथ भारती, पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा, पूर्व दिल्लीतून कुलदीप कुमार आणि दक्षिण दिल्लीतून साहिरम यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : कॉंग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून भाजप विरोधात प्रचार करणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे दोन्ही नेते आगामी निवडणुकीत कॉंग्रेस पक्षालाच मतदान करू शकणार नाहीत. नवी दिल्ली येथे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे वास्तव्य आहे. मात्र, त्यांचे वास्तव्य असणारा मतदारसंघ जागावाटपात सहकारी पक्षने घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना आता कॉंग्रेसऐवजी सहकारी पक्षाला मतदान करावे लागणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, जागा वाटपावरून कॉंग्रेस सोबत मतभेद झाल्याने अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीतील लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली. परंतु, कॉंग्रेस नेत्यांनी केजरीवाल यांची भेटली. त्यामुळे आपने पुन्हा एकदा जागावाटपाबाबत कॉंग्रेससोबत चर्चा केली.
नवी दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांपैकी 4 जागा आम आदमी पक्ष आणि 3 जागा कॉंग्रेस लढविणार आहे. या चारही जागांच्या उमदेवारांची घोषणा आपने केली आहे. नवी दिल्लीमधून सोमनाथ भारती, पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा, पूर्व दिल्लीतून कुलदीप कुमार आणि दक्षिण दिल्लीतून साहिरम यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. हे चारही उमेदवार आम आदमी पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि नेते आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने या चारही नेत्यांवर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिली आहे. यापैकी सोमनाथ भारती, कुलदीप कुमार आणि साहिरम हे आम आदमी पक्षाचे आमदार आहेत. यातील सोमनाथ भारती हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. तर, 28 डिसेंबर 2013 ते 14 फेब्रुवारी 2014 पर्यंत अरविंद केजरीवाल यांच्या 49 दिवसांच्या सरकारमध्ये ते दिल्लीचे कायदा मंत्री होते.
सोमनाथ भारती यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रस आणि भाजप विरोधात निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांचा काही मतांनी पराभव झाला. सोमनाथ भारती यांच्यामुळे कॉंग्रेस उमेदवाराचा पराभव होऊन भाजपच्या मीनाक्षी लेखी या विजयी झाल्या होत्या. परंतु, आता जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ आपच्या वाट्याला आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी ही जागा महत्वाची मानली जात आहे.
दुसरीकडे, काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे देखील नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे मतदार आहेत. नवी दिल्लीची जागा आप पक्षाकडे गेली आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या या दोन्ही बड्या नेत्यांवर कदाचित पहिल्यांदाच त्यांच्या पक्षाबाहेरील व्यक्तीला मतदान करण्याची वेळ येणार आहे.