बारामती : 2014 च्या निवडणुकीत रासपचे उमेदवार महादेव जानकर यांनी बारामतीतून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची दमछाक केली होती. लाखोंच्या फरकाने विजयी होणाऱ्या सुप्रिया सुळे केवळ 70 हजार मतांनी विजयी झाल्या. पण 2014 ला झालेलं गंगेला मिळालं, आता यावेळी साथ द्या, अशी भावनिक साद सुप्रिया सुळेंनी दौंडमधील मतदारांना घातली आहे. 2014 ला दौंड विधानसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांनी आघाडी घेतली होती.
2014 च्या निवडणुकीत आताच्या सत्ताधाऱ्यांनी महागाईचा मुद्दा पुढे करत सत्ता मिळवली. मात्र त्यांच्या काळात आज सर्वच घटकांच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे आता बहोत हुई महंगाई की मार, ‘अबकी बार लांबूनच नमस्कार’ असंच म्हणावं लागेल, अशा शब्दात बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला.
विद्यमान परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी विरोधक म्हणून केलेल्या भाषणाचा दाखलाही सुप्रिया सुळेंनी दिला. बुलेट ट्रेनने देशाचं पोट भरणार नाही, पण लाखोंचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याने जर संप केला तर सर्वांचे वांदे होतील, हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवं, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय.
दौंड तालुक्यातील राजेगाव येथे आज खासदार सुप्रिया सुळे यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. सुषमा स्वराज या आघाडीचे सरकार सत्तेत असताना योजनांच्या आकड्यांनी पोट भरत नसल्याचं सांगायच्या. पण आजची स्थिती पाहिली तर बुलेट ट्रेनने देशाची भूक भागणार नाही. पण लाखोंचा पोशिंदा असणारा शेतकरी संपावर गेला तर सर्वांचे खायचे वांदे होतील हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निषाणा साधला.
या सरकारच्या मागील पाच वर्षाच्या काळात सर्वच घटक अक्षरशः निराश झालेत. त्यामुळेच मागील निवडणुकीत बहोत हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या या सरकारला अबकी बार लांबूनच नमस्कार असं म्हणत त्यांना दूरच ठेवा असंही आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.
यावेळी बोलताना त्यांनी दौंडच्या मतदारांना भावनिक आवाहन केलं. मागील निवडणुकीत आपल्याला दौंडमधून कमी मताधिक्य मिळालं. त्यावर आता चर्चा करण्यात वेळ न घालवता झालं गेलं गंगेला व्हायलं असं म्हणत त्यांनी या निवडणुकीत साथ देण्याचं आवाहन केलं.
दौंडमधून भाजपच्या वतीने विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपनेही ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. कांचन कुल यांचं माहेरही बारामतीच आहे. बारामती मतदारसंघासाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 14 जागांसाठी मतदान होईल. लोकसभेचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे.