लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निलंगेकर यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती, मात्र आज (बुधवार 5 ऑगस्ट) पहाटे 2.30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. निलंगा येथे आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. (Former Chief Minister of Maharashtra Congress Leader Shivajirao Patil Nilangekar Dies)
मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार सुरु असताना शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन झालं. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना 16 जुलैला कोरोनाची लागण झाली होती. लक्षणं जाणवत असल्याने तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पुण्यातील खासगी रुग्णालयात निलंगेकर यांच्यावर उपचार सुरु होते.
मधुमेह, रक्तदाब, किडनी विकार असताना कोरोनाची लागण झाल्याने डाॅक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागातील विलगीकरणात ठेवले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती.
हेही वाचा : कट्टर राजकीय विरोधक निलंगेकर आजोबा-नातू एकाच मंचावर
निलंगेकर हे 1985 ते 86 या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता.
एमडी परीक्षेत आपल्या मुलीच्या गुणांमध्ये बदल केल्याचे समजल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता, त्यांचा कार्यकाळ सर्वात अल्प मानला जातो.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाजपचे माजी मंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू आहेत. एकमेकांच्या विरोधात त्यांनी विधानसभा निवडणुकाही लढवल्या आहेत. राजकारणातले कट्टर विरोधक असलेले आजोबा-नातू यावर्षीच शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला एकत्र आले होते. (Former Chief Minister of Maharashtra Congress Leader Shivajirao Patil Nilangekar Dies)