पुणे : मनसेचे (MNS) पुण्यातील (Pune) नगर वसंत मोरे (Vasant More) गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आहेत. आता पुन्हा एक वादळी घडामोड पुण्यातील मनसेच्या गोटातून समोर आली आहे. वसंत मोरेंचे कट्टर समर्थ असलेल्या निलेश माझिरे यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केलाय. निलेश माझिके हे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. नुकतंच निलेश माझिरे यांची मनसेच्या माथाडी सेनेच्या अध्यक्षपदावर हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर निलेश माझिरे नाराज होते. वसंत मोरे यांनीही यावरुन आपली खदखद व्यक्त केली होती. दरम्यान, आता निलेश माझिरे यांनी मनसे सोडताना दोघा मनसेच्या नेत्यांवर गंभीर आरोप केलेत.
साईनाथ बाबर आणि बाबू वागस्कर यांच्यामुळे मी पक्ष सोडल्याचा आरोप निलेश माझिरे यांनी केलाय. मी वसंत मोरे यांचा कट्टर समर्थक असल्याने मला कोअर कमिटीने डावलं, असाही सनसनाटी आरोप त्यांनी केलाय. निलेश माझिर यांच्याकडून नुकतच मनसेच्या माथाडी सेनेचं शहराध्यक्ष पद काढून घेण्यात आलं होतं.
पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची नुकतीस सभा झाली होती. त्यावेळीही वसंत मोरे यांची खदखद उघडपणे पाहायला मिळाली होती. पण मी आणि निलेश मनसेतच आहोत, असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं होतं. राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेच्या पूर्वसंध्येला वसंत मोरंनी निलेश माझिरे यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केलं होतं. निलेश माझिरे मनसे सोडणार असल्याचा अफवा पक्षातील लोकांकडूनच उठवत असल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला होता. निलेश माझिरे मनसेच आहे, असं म्हणत तेव्हा वसंत मोरे आणि निलेश माझिरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेनंतर पंधरा दिवसांनंतर निलेश माझिरेंनी मनसेचा सोडली आहे. त्यामुळे पुण्यातील मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसंच हा वसंत मोरे यांच्यासाठीदेखील मोठा धक्का मानला जातोय. आता निलेश माझिरे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचीही चर्चा रंगली आहे.