पुढच्या वेळी कोकणात दोन्ही खासदार भाजपचे असतील : राणे
भाजपात प्रवेश करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा आक्षेप असण्याचं काहीही कारण नाही, असंही ते (Narayan Rane BJP) म्हणाले.
सिंधुदुर्ग : येत्या आठ दिवसात भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane BJP) यांनी केली. भाजपात प्रवेश करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा आक्षेप असण्याचं काहीही कारण नाही, असंही ते (Narayan Rane BJP) म्हणाले. शिवसेना कोकणात मी आणली होती, त्यामुळे भाजपात प्रवेश केल्यास कोकणात पुढच्या वेळी दोन्ही खासदार भाजपचे असतील, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.
सावंतवाडीत राणेंनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि भाजपात जाण्याबाबत कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी सोबत आहेत आणि राहतील, असंही राणे म्हणाले. भाजप प्रवेश कधी होईल हे आता सांगू शकत नाही, पण येत्या आठ दिवसात तो होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
“जिल्ह्यातील कार्यकर्तेही भाजपात येतील”
“युती होऊ दे किंवा नको होऊ दे, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. माझं बोलणं भाजप नेते आणि मुख्यमंत्र्याशी झालंय. त्यामुळे प्रवेश ते देणार आहेत. ते तारीख जाहीर करतील. युती होईल की नाही हा माझा विषय नाही, त्यामुळे मला त्यावर भाध्य करायचं नाही. उद्या जर माझा प्रवेश असेल तर अशावेळी माझ्या कार्यकर्त्याला अंधारात ठेवून मी निर्णय करणं योग्य वाटत नाही. म्हणून त्यांचे मत जाणून घेतलं. सर्वांनी अनुमती दिली. शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाताना कार्यकर्ते माझ्यासोबत आले, कांग्रेस सोडून पक्ष काढला तेव्हाही माझ्यासोबत आले, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते माझ्याबरोबर भाजपात येतील,” असं राणे म्हणाले.
“कोकणात पुढच्या वेळी दोन्ही खासदार भाजपचे”
भाजपात प्रवेश केल्यानंतर कोकणातही पक्ष वाढवणार असल्याचं राणेंनी (Narayan Rane BJP) सांगितलं. “मी शिवसेना कोकणात आणली, मी काँग्रेसमध्ये आलो तेव्हा इथे काँग्रेसचे आमदार, खासदार निवडून आणले. सध्या दोन्ही जिल्ह्यात भाजपचे खासदार, आमदार नाहीत. आता यावेळेला भाजपने प्रवेश दिल्यास पुढच्या वेळी ते भाजपचेच दिसतील, असा विश्वास मी देतो,” असं राणे म्हणाले.
नाणार प्रकल्पावर ‘नो कमेंट्स’
नाणार प्रकल्प पुन्हा येणार असल्याचं संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत. पण नाणार प्रकल्पाबाबत मी भाजपात गेल्यावर जाहीर करेन, एवढी घाई कशाला करता? दोन-तीन दिवसात नाणार प्रकल्प होणार नाही, असं म्हणत राणेंनी बोलणं टाळलं. दरम्यान, नाणारवर शिवसेनेचं काय मत आहे, दर तासाला ते भूमिका बदलतात. शिवसेनेच्या बदललेल्या सुराची मी दखलही घेत नाही, असंही ते (Narayan Rane BJP) म्हणाले.
“नितेश राणे कमळ चिन्हावर लढणार”
भाजपमध्ये गेल्यावर नितेश राणे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. मला इथल्या स्थानिक नेत्यांच्या मतावर भाष्य करायचं नाही. योग्य वेळी प्रवेश होईल, ज्योतिषाला तारीख आणि वेळ दिलीय, अशी मिश्किली प्रतिक्रिया राणेंनी दिली. भाजपचे स्थानिक नेते प्रमोद जठार यांनी राणेंच्या प्रवेशावर, प्रवेश दिल्लीतून जाहीर होतो, असं वक्तव्य केलं होतं.
“नेते इकडून तिकडे जातच राहणार”
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवरही राणेंनी भाष्य केलं. सध्याचं वातावरण आणि लोकशाहीत निवडणुका होत आहेत ते पाहाता असंच घडणार असं मला वाटतं. प्रवेश असेच होणार. नेते इकडून तिकडे जात राहणार. याला नैतिकता कुठे आहे असं वाटत नाही. पण ते निर्णय घेतले जातात, असं राणे म्हणाले.
दरम्यान, राज्यभरातील समर्थकांना तिकीट देण्यासाठी प्रयत्न करेन, असंही राणे म्हणाले. या प्रश्नावर ते म्हणाले, “अरे नवीन घरात जाण्याआधी तुम्ही प्रश्न विचारत आहात… लग्न झालेली एखादी मुलगी घरात आल्यावर काही दिवस तिला घर दाखवलं जातं…इथे खिडक्या, इथे दरवाजा, अमुक तमुक…तुम्ही प्रवेश व्ह्ययच्या आधीच प्रश्न विचारत आहात…”