तख्तापलट करुन मुख्यमंत्री बनलेल्या नेत्यासह अनेक माजी मंत्री भाजपात
भास्कर राव यांच्यासोबत अनेक माजी मंत्र्यांनी आणि माजी खासदारांनीही भाजपात प्रवेश केला. भाजपाने दक्षिणेत पक्ष वाढवण्यासाठी जोर लावलाय. गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी हैदराबादमध्ये सदस्यता अभियानाचा शुभारंभ केला. त्यावेळीच हा प्रवेशही पार पडला.
हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन भास्कर राव यांनी भाजपात प्रवेश केला. ते अनेक दिवसांपासून सक्रिय राजकारणापासून दूर होते, मात्र पुन्हा एकदा त्यांनी नवी इनिंग सुरु केली आहे. त्यांच्यासोबत अनेक माजी मंत्र्यांनी आणि माजी खासदारांनीही भाजपात प्रवेश केला. भाजपाने दक्षिणेत पक्ष वाढवण्यासाठी जोर लावलाय. गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी हैदराबादमध्ये सदस्यता अभियानाचा शुभारंभ केला. त्यावेळीच हा प्रवेशही पार पडला.
भास्कर राव हे 1984 मध्ये एका महिन्यासाठी मुख्यमंत्री होते. तेलगू देसम पक्षाचे संस्थापक एन. टी. रामा राव यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री असताना त्यांनी तख्तापालट केला होता. दरम्यान, यानंतर भास्कर राव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.
भास्कर राव यांच्यासोबतच माजी मंत्री पेद्दी रेड्डी, माजी खासदार राममोहन रेड्डी, सुरेश रेड्डी, माजी आमदार शशीधर रेड्डी, सिनेमानिर्माता बेलमकोंडा रमेश, निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रदान आणि अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. अमित शाहांनी या सर्व नेत्यांचं भाजपात स्वागत केलं.
पश्चिम बंगालमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपने आता दक्षिणेत लक्ष केंद्रीत केलंय. या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त दक्षिण भारतातूनच कमी जागा मिळाल्या. केरळ, आंध्र प्रदेश तामिळनाडूमध्ये भाजपचा सुपडासाफ झाला होता. भाजपने आत्तापासूनच 2024 ची तयारी सुरु केल्याचं दिसतंय. कारण, अमित शाहांच्या उपस्थितीत या दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.