सर्वात मोठी बातमी! शिंदे गटाला पहिल्यांदाच झटका, नगरसेविकेचा ठाकरे गटात प्रवेश; आता बॅक टू पव्हेलियन सुरू?
तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली होती. 40 आमदार आणि 12 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून सवतासुभा मांडला होता. त्यानंतर शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली.
ठाणे: ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात जाण्याचा खासदार, आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा ओघ सुरू असून त्याला आता फुलस्टॉप लागत असल्याचं चिन्हं दिसत आहे. तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गटाला धक्का बसला आहे. शिंदे गटाच्या ठाण्यातील नगरसेविकेने आज ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी येऊन या नगरसेविकेने आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातूनच त्यांना पहिला धक्का बसल्याने शिंदे गटाला हा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.
ठाण्यातील शिंदे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी भास्कर वेरीशेट्टी यांनी मातोश्रीवर येऊन आज प्रवेश केला. रागिणी वेरीशेट्टी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह हा प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी रागिणी वेरीशेट्टी यांच्यासह भास्कर वेरीशेट्टी, साहिल वेरीशेट्टी आणि इतर कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून त्यांना ठाकरे गटात प्रवेश दिला.
यावेळी रागिणी वेरीशेट्टी यांनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचं वचन उद्धव ठाकरे यांना दिलं. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या अनिताताई बिर्जे, खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर, ठाणे जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर आणि असंख्य कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.
तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली होती. 40 आमदार आणि 12 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून सवतासुभा मांडला होता. त्यानंतर शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन होऊन मुख्यमंत्रीपद शिंदे गटाकडे आल्याने ठाकरे गटातून शिंदे गटाकडे येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा ओघ वाढला होता.
ठाकरे गटातून शिंदे गटाकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढल्याने ठाकरे गटाची चांगलीच डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे ठाकरे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्नच निर्माण झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता रागिणी वेरीशेट्टी यांच्या प्रवेशामुळे ही कोंडी फुटली आहे. पहिल्यांदाच शिंदे गटातून ठाकरे गटात कोणी तरी आल्याने ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.