आणीबाणीच्या काळात प्रेम, कुटुंबाचा विरोध असतानाही विवाह, सुषमा स्वराज यांची अनोखी ‘लव्हस्टोरी’
आणीबाणीच्या काळात सुषमा स्वराज यांनी स्वराज कौशल यांच्याशी प्रेमविवाह केला. सुषमा स्वराज या नेहमी आपल्या नवऱ्याच्या दिर्घाआयुष्यासाठी करवाचौथचा उपवास करायच्या. करवाचौथच्या उपवासावेळी तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं निधन झालं. मंगळवारी (6 ऑगस्ट) संध्याकाळी त्यांच्या (Sushma Swaraj) छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारदरम्यान रात्री 11 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या अकाली निधानामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुषमा स्वराज यांच्या तत्परतेमुळे त्यांच्या नावाची चर्चा फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आहेत. सुषमा स्वराज यांनी फार कमी वयात राजकारणात पाऊल ठेवलं. सुषमा स्वराज या राजकारणाप्रमाणे सोशल मीडियावरही फार सक्रीय असायच्या. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या पती स्वराज कौशल यांच्याशी मजा मस्ती करायच्या. विशेष म्हणजे आणीबाणीच्या काळात सुषमा स्वराज यांनी स्वराज कौशल यांच्याशी प्रेमविवाह केला.
या काळात मुलींना घरातून बाहेर पडण्याचेही स्वातंत्र्य दिले जात नव्हते. मात्र एखाद्या शूर महिलेप्रमाणे सुषमा स्वराज घराबाहेर पडत त्यांनी वकीलीचे शिक्षण घेतले. इतकंच नव्हे तर राजकारणातही त्या यशस्वी ठरल्या. विशेष म्हणजे ज्या काळात महिलांना स्वत:च्या मर्जीने लग्न करण्याचा अधिकार दिला जात नव्हता. त्यावेळी त्यांनी ही सर्व बंधन मोडून स्वराज कौशल यांच्याशी प्रेमविवाह केला.
सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांची भेट कॉलेजमध्ये झाली. ते दोघेही पंजाबच्या विद्यापीठातील चंदीगडच्या लॉ विभागात वकीलीचे शिक्षण घेत होते. कॉलेजमध्ये असताना त्या दोघांची नजरानजर झाली आणि मग त्या दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र बनले.
चंदीगडमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या दोघांनी दिल्लीतील कोर्टात वकीलीचा अभ्यास सुरु केला. त्या काळात ते दोघेही एकमेकांच्या जास्त जवळ आले आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम असल्याने त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल या दोघांच्याही कुटुंबाला त्यांचे प्रेम मान्य नव्हते. त्यामुळे या दोन्ही कुटुंबाने त्यांच्या या निर्णयाला नकार दिला.
मात्र त्यानंतर त्या दोघांनी कुटुंबाची मनधारणी केली आणि अखेर 13 जुलै 1975 मध्ये सुषमा स्वराज यांनी स्वराज कौशल यांच्याशी विवाह केला. लग्न होऊन 44 वर्षे उलटल्यानंतरही त्यांच्यातील प्रेम मात्र कायम होते. सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांच्यातील प्रेम अनेकदा सोशल मीडियावरही दिसले आहे.
एका सोशल मीडिया युजरने स्वराज कौशल यांना तुम्ही सुषमा स्वराज यांना सोशल मीडियावर फॉलो का करत नाही असा प्रश्न विचारला होता. ‘मी लिबीया किंवा यमनमध्ये अडकलेलो नाही’, असे अनोखे उत्तर स्वराज कौशल यांनी दिले होते.
विशेष म्हणजे सुषमा स्वराज या नेहमी आपल्या नवऱ्याच्या दीर्घाआयुष्यासाठी करवाचौथचा उपवास करायच्या. करवाचौथच्या उपवासावेळी तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.
सुषमा स्वराज यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याच्या निर्णय घेतला होता. या निर्णयाचे सर्व स्तरावरुन दुख: व्यक्त केले जात होतं. मात्र सुषमा स्वराज यांच्या निर्णयाचे स्वराज कौशल यांनी कौतुक केले होते.
मॅडम, तुम्ही पुढील निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तुमचे धन्यवाद. धावपटू मिल्खा सिंग यालाही थांबावे लागले होते. तुमची धाव 1977 मध्ये सुरु झाली. त्याला आता 41 वर्षे उलटली आहेत. आतापर्यंत तुम्ही 11 निवडणुका लढवल्यात. त्यातील 1991 आणि 2004 या दोन वर्षी तुम्ही निवडणूक लढलेली नाही. कारण तुम्हाला पक्षाने निवडणूक लढवण्यास मनाई केली होती. मी गेल्या 46 वर्षांपासून तुमच्या मागे धावत आहे. मी आता 19 वर्षांचा नाही. मी आता खरचं खूप थकलो आहे. अशा शब्दात त्यांनी सुषमा स्वराज यांचे कौतुक केले होते.
सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री निधन दिल्लीतील एम्समध्ये निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छातीत अचानकपणे दुखू लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्वराज यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण त्यांची झुंज अपयशी ठरली.
सुषमा स्वराज या प्रभावी वक्त्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. त्यांना सर्वपक्षीयांकडून मान-सन्मान मिळाला. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारतीय अडकले असतील, तर त्यांना सुषमा तातडीने मदत करत असत.
सुषमा स्वराज (14 फेब्रुवारी 1952 ते 6 ऑगस्ट 2019) यांची संपूर्ण कारकीर्द
2014 ते 2019 – परराष्ट्र मंत्री
मे 2014 ते जानेवारी 2016 – प्रवासी भारतीय कार्यमंत्री
2009 ते 2014 – लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या
जानेवारी 2003 ते मे 2004 – संसदीय कामकाज मंत्री
जानेवारी 2003 ते मे 2004 – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 – माहिती व प्रसारण मंत्री
ऑक्टोबर 1998 ते डिसेंबर 1998 – दिल्लीच्या मुख्यमंत्री
मे 2009 ते मे 2019 – खासदार (विदिशा लोकसभा मतदारसंघ)
मे 1996 ते ऑक्टोबर 1999 – खासदार (दक्षिण दिल्ली)
संबंधित बातम्या
वर्षभरात दिल्लीने गमावले तीन माजी मुख्यमंत्री, दोघींचं काही दिवसांच्याच अंतराने निधन
सुषमा स्वराज यांना किडनीदानाच्या इच्छेमुळे टीका झालेला मुस्लिम तरुण म्हणतो…
Sushma Swaraj | सुषमा स्वराज यांची पाच कामं, देश कधीही विसरणार नाही!