Shambhuraje Desai : हात हलवून, गमछा दाखवून नौटंकी आणि उसने आणण्याचा प्रयत्न, शंभूराजे देसाईंची संजय राऊतांवर टीका
जय राऊतांच्या बोलण्यानं आणि वागण्यानं गेल्या दोन वर्षात जे तयार केलंय त्याचा हा परिणाम असून, त्यांनीच शिवसेना संपवलीये अशी टीका शंभुराज देसाईंनी केली आहे.
सातारा : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने केलेल्या अटकेनंतर माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraje Desai) यांनी टीका केली आहे. ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईनंतर संजय राऊत हे एखाद्या युद्धाला निघाले असल्यासारखे निघाले होते. एका गैव्यवहार प्रकरणी त्यांना अटक (Arrest) झाली आहे हे ते विसरले होते. हात हलवून,गमच्छा दाखवून राऊत यांनी नौटंकी आणि उसने अवसान आणण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. मी शिवसेना सोडणार नाही असं संजय राऊत म्हणतायत, खरे तर त्यांनीच शिवसेना संपवली आहे. त्याच्या हेकेखोर स्वभावामुळेच शिवसेना संपली आहे, असेही देसाई पुढे म्हणाले.
कारवाई कशी चुकीची आहे हे अधिकाऱ्यांना पटवून द्या
ईडीने केलेल्या कारवाईचा संजय राऊत कांगावा करत आहेत. पुरावे घेऊनच राऊत यांच्यावर कारवाई झाली आहे. ईडी स्वायत्त संस्था आहे. या कामात कोणाचाच हस्तक्षेप नसतो. संजय राऊत यांना कर नाही तर डर कशाला ? कारवाई झाल्यावर सगळेच म्हणतात अडकवलं गेलंय, असं म्हणणं हे चुकीचं आहे. राऊतांचे भाऊ चुकीचं बोलतायेत. कारवाई कशी चुकीची आहे हे अधिकाऱ्यांना पटवून द्या, ते ईडीचे अधिकारी तपासतील. संजय राऊतांच्या बोलण्यानं आणि वागण्यानं गेल्या दोन वर्षात जे तयार केलंय त्याचा हा परिणाम असून, त्यांनीच शिवसेना संपवलीये अशी टीका शंभुराज देसाईंनी केली आहे. तसेच राऊतांवर झालेल्या कारवाईत भाजपाचा हात नाही, असेही शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
राऊतांची वैद्यकीय तपासणी पूर्ण
ईडीच्या अटकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. संजय राऊत यांची सुमारे 40 मिनिटे वैद्यकीय तपासणी झाली. संजय राऊत डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर येताच रुग्णालयातून शिवसेना कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर संजय राऊत यांनी हात हलवून कार्यकर्त्यांचे आभार मानले. संजय राऊत यांच्या वैद्यकीय तपासणीपूर्वी रुग्णालयाच्या आत आणि बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणतीही मीडिया किंवा बाहेरील व्यक्ती रुग्णालयात येऊ नये यासाठी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती. (Former Home Minister Shambhuraj Desai criticizes Sanjay Raut regarding ED action)