गोव्यात भाजपकडून पर्रिकरांच्या मुलाला तिकीट नाही
पणजी : भारतीय जनता पक्षाने पणजीमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या जागेहून मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. मात्र, कार्यकर्त्यांची मागणी मान्य न करता भाजपने पणजीमध्ये […]
पणजी : भारतीय जनता पक्षाने पणजीमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या जागेहून मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. मात्र, कार्यकर्त्यांची मागणी मान्य न करता भाजपने पणजीमध्ये माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी जाहीर केली. याच जागेवरुन माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते. गेल्या 17 मार्चला पर्रिकरांचं स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झालं. त्यानंतर ही जागा रिक्त झाली. त्यासाठी पणजीमध्ये 19 मे रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
पणजी विधानसभेसाठी कुणाला उमेदवारी द्यावी यासाठी, प्रदेश भाजपने पणजी मनपाचे भाजप नगरसेवक, पणजी भाजप मंडळ पदाधिकारी यांची मतं जाणून घेतली. त्यानंतर राज्य निवडणूक समितीने सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि उत्पल पर्रिकर यांची नावं केंद्रीय समितीपुढे केली होती. त्यानंतर, भाजपने घराणेशाहीला मागे सारत उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी न देता त्यांच्या जागी एका नव्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं. वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात केंद्रीय नेते व्यस्त असल्याने पणजीच्या उमेदवाराच्या नावाची निवड करण्यात उशिर झाला. त्यानंतर आज भाजपने सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. सिद्धार्थ कुंकळ्येकर हे पणजी मतदार संघातून दोनवेळा निवडून आले आहेत.
BJP releases list of candidates for bye-elections to 2 legislative assembly constituencies of Karnataka & 1 of Goa; Sidharth Kuncalienker to contest from Panaji, Avinash Yadav from Chincholi & SI Chikkanagowdar from Kundgol pic.twitter.com/6sIIpAltYL
— ANI (@ANI) April 28, 2019
भाजपचे केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य जगत प्रकाश नड्डा यांनी रविवारी दुपारी सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या नावाची घोषणा केली. गोव्यात 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पणजी विधानसभेच्या जागेवरुन सिद्धार्थ कुंकळ्येकर जिंकले होते. त्यानंतर त्यांनी मनोहर पर्रिकरांसाठी ही जागा सोडली. पर्रिकर त्यावेळी संरक्षण मंत्री होते, त्यानंतर त्यांना गोव्याचे मुख्यमंत्री बनवण्यात आलं.
पणजीच्या विधानसभा पोटनिवडणुकांसोबतच भाजपने कर्नाटकच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठीही उमेदवारांची घोषणा केली. कर्नाटकच्या चिंचोली येथून अविनाश जाधव आणि कुंडगोल येथून एस.आय. चिक्कनगोदर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भाजपकडून घराणेशाही टाळण्याचा प्रयत्न
यंदाच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी भाजपने घराणेशाही टाळण्याचा प्रयत्न केला आहे. गोव्याच्या पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मोठा मुलगा उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात यावी, यासाठी भाजप कार्यकर्ते आग्रही होते. मात्र, भाजपने सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी जाहीर केली. तसेच, यापूर्वीही भाजपने घराणेशाहीला बाजुला सारत नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. बंगळुरुतून भाजपचे दिवंगत नेते अनंत कुमार यांच्या जागेवर त्यांच्या पत्नींना उमेदवारी जाहीर व्हावी, अशी मागणी होती. मात्र, भाजपने 28 वर्षीय युवा नेता तेजस्वी सूर्या यांना उमेदवारी जाहीर केली. तर इकडे गुरदासपूरमधून विनोद खन्ना यांच्या पत्नीची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. तिथेही भाजपने अभिनेते सनी देओल यांना तिकीट दिलं.