संभाजीराजेंच्या ‘त्या’ भूमिकेला राष्ट्रवादी चित्रपट विभागाचा पाठिंबा; मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
सिनेमॅटिक लिबर्टीच्या (Cinematic Liberty) नावाखाली इतिहासाचे विकृतीकरणाचे उदात्तीकरण होऊ शकत नाही, असं माजी खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Raje)यांनी म्हटलं असून त्यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादी चित्रपट विभागाने समर्थन दिलं आहे.
पुणे : सध्या भारतात ऐतिहासिक सिनेमाची निर्मिती करण्याची जणू काही चढाओढ लागलेली आहे, कुठलाही अभ्यास न करता अर्धवट ज्ञानाच्या आधारावर सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली अतिशय आक्रस्ताळेपणाने ऐतिहासिक सिनेमांची मोडतोड करून ती आपल्या गळी उतरवली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजी छत्रपती (Sambhaji Raje)यांनी काल (06 नोव्हेंबर) ला पत्रकार परिषद घेऊन ‘हरहर महादेव’ तसेच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedant Marathe Veer Daudale Saat) या सिनेमांवर जाहीर नाराजी व्यक्त केली. निर्माते व दिग्दर्शकांनी इतिहासाची मोडतोड केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम संभाजी राजेंनी दिला आहे. संभाजीराजेंच्या निर्णयाला राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाकडून समर्थन देण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाची भूमिका काय?
भविष्यात केंद्राने व राज्य सरकारने चित्रपट सेंसोर बोर्डावर ऐतिहासिक संशोधक मंडळावर सदस्यांची नियुक्ती लवकरात लवकर करावी, याबाबतीतलं निवेदन राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाकडून राज्यसरकारला देण्यात येणार आहे. जेणेकरून भावी पिढीसाठी मोडतोड झालेला व जाणीवपूर्वक केलेला इतिहास हे व्यावसायिक लोक मांडणार नाहीत.
लवकरच याबाबतीत राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील हे छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. तसेच या बाबतीतलं पत्र मुख्यमंत्री, केंद्रीय व राज्य सांस्कृतिक मंत्री, केंद्रीय सेंसर बोर्ड, महाराष्ट्रातील सेंसर बोर्ड अशा सर्वांना राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भेटून निवेदनाद्वारे देणार आहेत.
तसेच आगामी येणाऱ्या ऐतिहासिक सिनेमांकडे राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग कटाक्षाने अभ्यासपूर्वक लक्ष देणार असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.