युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जिल्हाध्यक्षांचा एकाचवेळी राजीनामा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या राज्यात जनतेमध्ये जाऊन मिसळत असले तरी मुंबईतील राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. मुंबईतील युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जिल्हाध्यक्षांनी एकाचवेळी राजीनामा दिलाय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवण्यात आलाय. शिवाय एक पत्र लिहिलंय, ज्यात अनेक आरोपही करण्यात आले आहेत. दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष सुनील पालवे, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या राज्यात जनतेमध्ये जाऊन मिसळत असले तरी मुंबईतील राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. मुंबईतील युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जिल्हाध्यक्षांनी एकाचवेळी राजीनामा दिलाय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवण्यात आलाय. शिवाय एक पत्र लिहिलंय, ज्यात अनेक आरोपही करण्यात आले आहेत.
दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष सुनील पालवे, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेंद्र थोरात, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष रंगनाथन अय्यर आणि उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष अरुण मिश्रा यांनी जयंत पाटलांकडे राजीनामे पाठवले आहेत. शिवाय एक पत्रही लिहिलंय. या पत्रातून वरिष्ठांकडून कसा छळ केला जातोय, त्याबाबत तक्रार केली आहे.
युवक राष्ट्रवादीच्या मुंबई जिल्हाध्यक्षांकडून आम्हा चार जणांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली गेली. शिवाय त्यांच्या मनमानी कारभारामुळे आम्हाला अडचणीत आणण्याचाही प्रयत्न झाला. मुंबईमधील वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांसमोर आम्हाला खोटे पाडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. पण आम्ही कायम आमच्या पदाला न्याय दिलाय, असं या पत्रात नमूद करण्यात आलंय.
मी सांगेल तेच काम करा, अन्यथा पदमुक्त करेन, अशी धमकीही मुंबई युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षांकडून देण्यात आली. पण ते सांगत असलेलं काम पक्षहिताचं नसल्यामुळे आम्ही स्वतःहून पदमुक्त होण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी युवक मुंबई अध्यक्षाच्या या हिटलरशाहीखाली आम्ही काम करु शकत नाही, पण पक्षाशी कायम निष्ठ राहू, असं पत्रात लिहिलंय.