‘EVM मशीन थेट सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात’, चंद्रकांत खैरे यांचा मोठा आरोप!
ईव्हीएम मशीन नको. बॅलेट पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असं खैरे यांनी स्पष्ट केलं.
गडचिरोली : महाराष्ट्रात 48 जागा जिंकून आणू, असा दावा भाजपचे दिग्गज नेते अमित शाह (Amit Shah) हे कोणत्या आधारावर करत आहेत. त्यांच्या या दाव्यामागे नक्की काहीतरी षडयंत्र आहे. देशात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात, त्यामुळेच ते एवढे खात्रीशीर दावे करू शकतात, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यामुळे ईव्हीएम नको बॅलेट पेपर हवा, अशी माझी प्रमुख मागणी असल्याचं खैरे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने राज्यभरात शिवगर्जना अभियानाला सुरुवात केली आहे. याअंतर्गत ठाकरे गटाचे विविध कार्यकर्ते राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत. औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगरातील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा शिवगर्जना यात्रेतील दौरा गडचिरोलीत आयोजित करण्यात आला आहे.
‘मिंधे गटाला स्ट्राँग केलं जातंय’
चंद्रकांत खैरे यांनी गडचिरोलीत पोहोचल्यावर एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘ महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. शिवसेना फोडण्याचं नीच काम मिंधे गटाने केलं आहे. फडणवीसांनी त्यांना स्ट्राँग केलंय. विकासाचं काम नाही. नोकऱ्या नाही. महागाई वाढली. एवढं असताना मिंधे गटानं स्ट्राँग केलं जातंय, हेच सांगायला आम्ही इथे आलो आहोत, अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली.
गडचिरोलीत शिवसेना मजबूत
गडचिरोलीतील शिवगर्जना अभियानाला जोरात सुरुवात झाल्याचं खैरे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी येथील एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. इथले फक्त ४ टाकून दिलेले नेते आहेत, तेच शिंदे गटात गेले. बाकीचे एकही महिला आघाडी किंवा युवासेनेतील नेते शिंदे गटात गेला नाही, हे अभिमानाने सांगावं वाटतं, अशी भावना खैरे यांनी व्यक्त केली.
‘ईव्हीएम नको बॅलेट पेपर हवे’
ईव्हीएम मशीन नको. बॅलेट पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असं खैरे यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, अमित शाह मोठ्या मोठ्या घोषणा करतात. ४८ जागा महाराष्ट्रात जिंकू, ३६ जागा बिहारमध्ये जिंकू. हे कोणत्या मुद्द्यावरून सांगता. आता जनता ते मान्य करणार नाही. हे सगळं सॅटेलाइटद्वारे मॅन्युप्युलेट केलं जातंय. त्यामुळे ईव्हीएम मशीन नको आम्हाला बॅलेट पेपरच हवा, अशी मागणी आमचे सर्व नेते करणार आहेत. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने ही मागणी अधिक आक्रमकपणे केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.