डिस्को पब चालतात मग गणेशोत्सव का नाही?, राज्य सरकारच्या नियमावलीवर आशिष शेलारांचा घणाघात
गणेशोत्सवाबाबत एक एक नियम असे घातले आहेत की आता घरातल्या धातूच्या मूर्तीचं पूजन करावं लागेल. राज्य सरकारला डिस्को पब चालतात आणि गणेशोत्सव चालत नाहीत, अशी टीका शेलार यांनी केलीय.
मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी 4 फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी 2 फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. या नियमावलीवरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. ठाकरे सरकारचं काय चाललंय ते कळत नाही. गणेशोत्सव आणि कोरोना अटकाव याचा संबंध नाही. सरकारनं हा निर्णय घेताना कुणालाही विचारात घेतलं नाही. राज्य सरकारला डिस्को पब चालतात मग गणेशोत्सव का चालत नाही, असा सवाल शेलार यांनी केलाय. (Ashish Shelar criticizes Thackeray government over Ganeshotsav rules)
गणेशोत्सवाबाबत एक एक नियम असे घातले आहेत की आता घरातल्या धातूच्या मूर्तीचं पूजन करावं लागेल. राज्य सरकारला डिस्को पब चालतात आणि गणेशोत्सव चालत नाहीत. गणेशमूर्ती बनवायला तीन महिने आधीपासून सुरुवात केली जाते. आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मूर्तीकारांचं मोठं नुकसान होणार आहे. त्यांना एक रुपयाचीही मदत दिली गेली नाही. ठाकरे सरकार बिनडोकपणे वागत आहे. त्याचा आपण निषेध करतो, असा घणाघात शेलार यांनी महाविकास विकास आघाडी सरकारवर केलाय.
सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट तर घरगुती बाप्पा 2 फुटांचा
राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी 4 फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी 2 फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गृहविभागाच्या गणेशोत्स साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना
* गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित. * कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. *सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी *विसर्जन कृञिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी. * नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी. * शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी. *सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत * आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी. *नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे. * गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी
संबंधित बातम्या :
चाकरमान्यांना लागले गणेशोत्सवाचे वेध; कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल
Ashish Shelar criticizes Thackeray government over Ganeshotsav rules