बीडः कोरोनाचं संकट जसं दूर झालं, तसं महाराष्ट्रावरचं, शेतकऱ्यांवरचं नैसर्गिक संकटही दूर कर. कोरोना काळात जशी जीवाभावाची माणसं हिरावली गेली, ती दूर होऊ देऊ नकोस, अशी प्रार्थना बीडचे आमदार (Beed MLA) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी गणरायाच्या चरणी केली आहे. आज गणेश चतुर्थीनिमित्त (Ganesh Chaturthi) राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे.
मागील दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे सर्वांनी आपापल्या घरात गणेशोत्सव साजरा केला. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या घरीदेखील गणपतीची स्थापना झाली. त्यानंतर त्यांनी नाथ प्रतिष्ठान आयोजित वैजनाथ सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीची स्थापना पत्नी राजश्री मुंडे यांच्यासह केली आहे.
यंदा नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रावरील नैसर्गिक संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना केली. ते म्हणाले, ‘ कोविडमुळे विघ्नहर्त्याचं कुणाला मोकळेपणानं स्वागत करता आलं नाही. आता आपण या गणपतीला आनंदाने स्वागत करतोय.
कोविडच्या निर्बंधानंतरचा पहिला महोत्सव आहे. प्रत्येकजण तमाम जनतेला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. माझ्या घरीही आगमन झालंय. गणपती बाप्पाची स्थापना झाली. संबंध महाराष्ट्रावर, शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटं येत आहेत, ती दूर कर. जीवाभावाची माणसं दूर गेलीत. हे संकट दूर कर, अशी प्रार्थना विघ्नहर्त्यासमोर केल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.