अहमदनगर : तुमच्याकडून सरकार स्थापन होणार नसेल तर जनतेतून एखादा मुख्यमंत्री बनवा, असा उपहासात्मक सल्ला छोटा पुढारी घनश्याम दरोडे याने दिला आहे. सध्या राज्यात सत्तास्थापनेवरुन सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींन सर्वच राजकीय पक्षांचा समाचार घनश्यामने (Ghanshyam Darode on Political Situation) घेतला.
राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यावरुन घनश्यामने खंत व्यक्त केली. तुमच्या भांडणात शेतकरी मरतोय, आज याच्याकडे तर उद्या त्याच्याकडे तुमच्या बैठका सुरु आहेत. मात्र हे सर्व दूर ठेऊन आधी सरकार स्थापन करा, असं घनश्यामने राजकीय पक्षांना सुनावलं आहे.
राज्यात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. शेतकरी भरडला जात आहे. तुम्ही सरकार स्थापन करुन योग्य निर्णय घेतला तर बरं होईल, असंही घनश्याम म्हणाला.
तुम्ही आपापसात राजकारण करत बसू नका. कोणीही या आणि सरकार स्थापन करा आणि कर्जमुक्ती करा, असा सल्ला त्याने दिला आहे.
राज्यात भाजपशिवाय सत्ता येऊच शकत नाही, फडणवीसांचा दावा : सूत्र
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपती राजवट लागू झाली मात्र जनतेने एवढ्या उत्सुकतेने मतदान केले, त्यामुळे लोकशाहीवरील अविश्वास दूर होता कामा नये, अशी भीतीही त्याने बोलून दाखवली.
कोण आहे घनश्याम दरोडे?
घनश्याम दरोडे हा मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी तो दहावी पास झाला. घनश्यामची वक्तृत्वशैली भल्याभल्यांना भुरळ पाडणारी आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी घनश्यामने केलेली भाषणं सोशल मीडियावर चांगलीच वायरल झाली होती. तेव्हा तो जेमतेम 10-11 वर्षांचा होता.
घनश्यामचा जन्म अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे वडील दत्तात्रय दरोडे परंपरागत शेती करतात. घारगावच्या आश्रमशाळेत त्याचं शिक्षण झालं.
पारावरच्या राजकारणापासून राज्यातील घडामोडींवर बेधडक भाषणबाजी करण्याच्या कलेमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्याच्या मुलाखती प्रसिद्ध केल्याने घनश्याम रातोरात स्टार (Ghanshyam Darode on Political Situation) झाला.