Loksabha Election 2024 | नवी दिल्ली जिंकण्यासाठी ‘जायंट किलर’ सज्ज, आईने केला होता पंतप्रधान मोदी यांना विरोध
भाजपच्या पहिल्या यादीत सर्वात अनपेक्षित नाव 40 वर्षीय बन्सुरी यांचे होते. बन्सुरी यांना नवी दिल्लीतून तिकीट दिल्याने भाजप नेतेही आश्चर्यचकित झाले. याचे कारण म्हणजे सर्वोच्च नेतृत्वाने नवी दिल्लीसारख्या उच्चपदस्थ जागेसाठी नवशिक्याची निवड केली आहे.
नवी दिल्ली | 10 मार्च 2024 : दिल्लीमधील सात जागांपैकी भाजपने पाच जागांचे उमेदवार निश्चित केले आहेत. एकीकडे दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांनी एकत्र लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केलीय. तर दुसरीकडे, भाजपने पाचपैकी चार जागांवर नवीन उमेदवार दिले आहेत. गतवर्षी विजयी झालेल्या मनोज तिवारी यांना सोडून भाजपने या निवडणुकीत चार विद्यमान खासदारांची तिकिटे रद्द केली आहेत. नवी दिल्ली या महत्वाच्या मतदार संघातही मीनाक्षी लेखी यांचे तिकीट रद्द करण्यात आलेय. त्या ऐवजी पक्षाने बन्सुरी यांना तिकीट दिलीय. पक्ष नेतृत्वाच्या या निर्णयाने भाजप नेतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
बन्सुरी यांच्या नावाची घोषणा होताच भाजपने राजधानीत निवडणुकीचे वातावरण तयार केले आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून आपने सोमनाथ भारती यांना उमेदवारी दिली आहे. सोमनाथ भारती हे विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अशावेळी भाजपने नवख्या बन्सुरी यांना उमेदवारी दिलीय. बन्सुरी यांनी या निवडणुकीत आपचे सोमनाथ भारती यांचा पराभव केला तर दिल्ली भाजपमध्ये त्या एक मजबूत नेता म्हणून उदयास येतील. तसेच, तो मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही धक्का असेल. कारण अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
कोण आहेत बन्सुरी स्वराज?
बन्सुरी या दिल्लीत वकील म्हणून कार्यरत आहेत. बन्सुरी यांनी प्रसार माध्यमावर भाजपची बाजू आत्मविश्वासाने आणि स्पष्टतेने मांडून सर्वोच्च नेतृत्वाला प्रभावित केले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या शिष्या सुषमा स्वराज यांनी 2014 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध केला होता. त्याच सुषमा स्वराज यांच्या बन्सुरी या कन्या आहेत.
सुषमा स्वराज यांच्याप्रमाणेच बन्सुरी यांची वकृत्व शैली आक्रमक आहे. सुषमा स्वराज यांनी मध्य प्रदेशातील विदिशा आणि कर्नाटकातील बेल्लारी यासह देशातील अनेक भागांतून निवडणुका लढवल्या होत्या. त्यांच्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी सोनिया गांधी यांचा सामना केला होता. दिलीच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या छोट्या कार्यकाळात त्यांनी दिल्लीत स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.