गिरीश बापट की मुरलीधर मोहोळ, पुण्याचा उमेदवार कोण?
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तसंच विद्यमान नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. दोघांपैकी कुणाला भाजप तिकीट देणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती होती. मात्र, आता मुरलीधर मोहळ हे देखील याच जागेवरुन निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने भाजपसमोर […]
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तसंच विद्यमान नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. दोघांपैकी कुणाला भाजप तिकीट देणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती होती. मात्र, आता मुरलीधर मोहळ हे देखील याच जागेवरुन निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने भाजपसमोर हा पेच सोडवण्याचं मोठं आव्हान आहे.
एकीकडे भाजपमध्ये हा पेच असताना, तिकडे काँग्रेसमध्येही पुण्याच्या जागेवरुन तिढा कायम आहे.आधी संभाजी ब्रिगेडकडून चर्चेत असलेले खासदार संजय काकडे यांचं नाव आता काँग्रेसकडून पुन्हा पुढे करण्यात येत आहे. त्याशिवाय प्रवीण गायकवाड यांचंही नाव काँग्रेसकडूनच शर्यतीत आहे.
पुण्याचे भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं नाव मागे पडलं आहे. भाजपकडून गिरीश बापट यांचं नाव आघाडीवर आहे. त्यानंतर आता नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनीही उमेदवारीवर दावा केल्याने भाजपसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. यामुळे भाजपसाठी पुणे मतदारसंघाचा गुंता वाढत चालला आहे. दुसरीकडे पुण्यासाठी भाजपकडून युवा चेहरा मिळावा अशी वरिष्ठांकडे मागणी करण्यात येत आहे.
तिकडे काँग्रेसमध्येही पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन असाच संभ्रम आहे. पुण्यात काँग्रेसकडून भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे आणि संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे.
भाजपने अद्याप लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. मात्र, भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत अनेक नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या नावांची घोषणा अद्याप झालेली नाही. पक्षात बंडखोरी होऊ नये या भीतीने भाजप उमेदवारांच्या नावांवर अजूनही विचार करत आहे. त्यासाठी भाजप नेत्यांच्या बैठकाही होत आहेत. आता भाजप पक्षातील नेत्यांना खूष करण्यात किती यशस्वी ठरते हे उमेदवारांची यादी जाहीर झाल्यावरच कळेल.
भाजपच्या 7 उमेदवारांची नावं जवळपास निश्चित:
- नागपूर – नितीन गडकरी
- चंद्रपूर – हंसराज अहीर
- जालना – रावसाहेब दानवे
- पुणे – गिरीश बापट
- अकोला – संजय धोत्रे
- भिवंडी – कपिल पाटील
- गडचिरोली – अशोक नेते
निवडणुकीच्या तारखा जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.