Girish Mahajan : गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, पुणे पोलिसांकडून जळगावातून टेम्पोभर कागदपत्र जप्त
जळगावच्या मराठा विद्याप्रासारक (Maratha Vidyaprasarak case) संस्थेशी निगडीत वादातून भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता.
पुणे: जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादातून भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. पुणे पोलिसांनी जळगावमध्ये काही ठिकाणी छापे टाकले होते. पुणे पोलिसांनी या प्रकरणी जळगावातून टेम्पो भरून कागदपत्र जप्त केली आहेत. पुणे पोलिसांना यांना या प्रकरणात मोठं लीड मिळण्याची शक्यता असल्यानं भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, असं कळतंय.
पुणे पोलिसांनी टेम्पो भरुन कागदपत्र आणली
जळगावला गिरीश महाजन यांच्यविरोधात नोंदवण्यात आलेल्या संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाकडून एक टेम्पो भरून कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांनी कागदपत्र जप्त करत पुण्याला आणली आहेत. पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात जळगाव मराठा शिक्षण प्रसारक संस्थेसंदर्भातल्या वादातून महाजन आणि भोईटे यांच्या विरोधात अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता.
गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढणार?
जळगाव मराठा शिक्षण प्रसारक संस्थेशी संबंधित कागदपत्र ही भोईटे आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी मिळून आली आहेत. जी कागदपत्रं संस्थेत असणं आवश्यक आहेत ती दुसरीकडं आढळल्यानं या कागदपत्रांतून मोठे लीड मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादात दाखल गुन्ह्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय. सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. नंतर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. अॅड. विजय पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
इतर बातम्या:
गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार? पुणे पोलिसांचं पथक तपासासाठी जळगावात! नेमकं प्रकरण काय?
Girish Mahajan may face some problems Pune Police seized documents from Jalgaon in connection Maratha Vidya Prasarak Samaj Case