Girish Mahajan : थोडं शांत राहा, तू तू मै मै करू नका; गिरीश महाजनांचा नाथाभाऊंना इशारा
Girish Mahajan : पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडे कुठे नाराज आहेत, असं मला वाटतं नाही. पक्षश्रेष्ठी त्यांचा विचार करतील. त्यांना मोठं पद मिळेल, असं ते म्हणाले.
जळगाव: मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जळगावमध्ये आल्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. गुलाबराव पाटील आणि मी स्वतः ओबीसी आहोत. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर (obc) अन्याय केला हा एकनाथ खडसेंचा आरोप चुकीचा आहे. तुम्ही म्हणजे सगळे ओबीसी असं समजण्याचं कारण नाही. आपण थोडं शांत रहा. तू तू मै मै करू नका, असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. एकनाथ खडसे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर टीका केली होती. शिंदे-फडणवीस सरकारने विस्तारात ओबीसींवर अन्याय केल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावर महाजन पलटवार करताना त्यांनी ही टीका केली.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदाच जळगावात आले होते. यावेळी त्यांचं त्यांच्या समर्थकांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. तसेच राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आता जबाबदारी मोठी आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात विकास खुंटला होता. विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. आता डबल इंजिनचं सरकार आहे. राज्यात रखडलेला विकास मार्गी लागेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही दमदार नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला राज्याला पुढं न्यायचं आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.
अधिवेशनापूर्वीच खाते वाटप
मंत्रिपदे दिली, पण खाती वाटप कधी होणार? असा सवाल महाजन यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खाते वाटप लवकरच होणार आहे. अधिवेशन समोर असल्याने त्यापूर्वीच खाते वाटप करण्यात येईल, असं ते म्हणाले.
पंकजा मुंडे नाराज नाहीत
पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडे कुठे नाराज आहेत, असं मला वाटतं नाही. पक्षश्रेष्ठी त्यांचा विचार करतील. त्यांना मोठं पद मिळेल, असं ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर थोडीफार नाराजी असतेच मग ते एका पक्षाचे सरकार असलं तरी असतेच. थोडे दिवस ही नाराजी असते, असंही त्यांनी सांगितलं.
ठाकरेंनी ऑनलाईन सरकार चालवलं
मागच्या सरकारमध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्री मंत्रालयात आले नाहीत. त्यांनी ऑनलाईन सरकार चालवलं. ते आमदारांना भेटले नाहीत. मंत्र्यांना भेटले नाहीत. जनता तर दूरच राहिली. त्यामुळे राज्यातील अनेक प्रश्न रखडले आहेत, असं ते म्हणाले.
चित्रा वाघ यांचं मत वैयक्तिक
यावेळी त्यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली. ज्या सरकारने संजय राठोड यांना क्लिन चिट दिली. आता तेच प्रश्न उपस्थित करताहेत. म्हणजे चित भी हमारी आणि पट भी हमारी, असं सांगतानाच संजय राठोड यांच्याबाबतीत चित्रा वाघ यांचं मत वैयक्तिक आहे, असं त्यांनी सांगितलं.