गोवा काँग्रेसमध्ये भूकंप, 8 आमदार भाजपात प्रवेश करणार, ऑपरेशन लोटस यशस्वी?
गोव्यातील काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांचा भाजप प्रवेश होत आहे, याचाच अर्थ काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार भाजपात येत आहेत.
पणजीः गोव्यात (Goa Assempby) मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे तब्बल 8 आमदार (Congress MLA) भाजपात (BJP) प्रवेश करत आहेत. थोड्याच वेळात आमदारांचा भाजपात प्रवेश होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच गोव्यात ऑपरेशन लोटस राबवण्यात भाजपाला अपयश आलं होतं. मात्र आज भाजपाची राजकीय खेळी प्रभावी ठरताना दिसतेय. आज काँग्रेसचे आठ आमदार भाजपात प्रवेश करत आहेत. गोव्यातील काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांचा भाजप प्रवेश होत आहे, याचाच अर्थ काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार भाजपात येत आहेत.
Goa: Eight Congress MLAs to join BJP, says state party chief Sadanand Shet Tanavade
— Press Trust of India (@PTI_News) September 14, 2022
कोण-कोण आमदार?
- मायकल लोबो (माजी विरोधी पक्षनेते)
- दिगंबर कामत,
- दिलायला लोबो,
- राजेश फळदेसाई,
- रुदाल्फ फर्नांडिस,
- अलेक्स सिक्वेरा,
- केदार नाईक,
- संकल्प आमोणकर
हे आठ आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे आमदार विधान भवनात येण्यास सुरुवात झाली आहे.
संध्याकाळी भाजपाची पत्रकार परिषद
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा भाजपाचे अध्यक्ष सदानंद तनावडे यांची संयुक्त पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांचा भाजपात प्रवेश होणार असल्याने त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही आणि ते भाजपात विलीन होतील, असे म्हटले जात आहे. यापैकी काही आमदारांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गोवा विधानसभेत काय स्थिती?
गोवा विधानसभेत एकूण 40 सदस्यसंख्या आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच येथे विधानसभा निवडणुका झाल्या. यात भाजपा आणि मित्रपक्ष अर्थात NDA चे 25 आमदार आहेत. तर काँग्रेसचे 11 आमदार आहेत. मात्र आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांचा भाजपात प्रवेश होत असल्याची घोषणा केली आहे.
जुलैतही ऑपरेशन लोटसचे प्रयत्न?
काँग्रेसच्या 8 आमदारांनी आज भाजपात प्रवेश केला तर गोव्यात ऑपरेशन लोटस यशस्वी झाले, असे म्हणता येईल. जुलै महिन्यातदेखील भाजपने काँग्रेसच्या आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी 11 पैकी 5 आमदारांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र काँग्रेसने वेळीच सतर्कता दाखवत ही गळती थांबवली होती. त्यावेळी काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, राजेश फलदेसाई, केदार नाईक आणि दलीला लोबो हे बंडखोरी करणार असल्याची चर्चा होती. काँग्रेसने मायकल लोबो यांना पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत विरोधी पक्षनेते पदावरून हटवलं होतं.