गोवा : गेल्या आठ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात जी राजकीय स्थिती आणि जो संशय कल्लोळ शिवसेनेत सुरू होता. तसाच संशयकल्लोळ सध्या गोवा काँग्रेसमध्ये (Goa Congress) सुरू आहे. गोव्यातले काँग्रेस आमदारही (Goa Congress MLA) शिवसेनेच्या आमदारांसारखेच वेगळा गट तयार करण्याच्या तयारीत असल्याचे आणि सरकारला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर काही आमदारांनी काँग्रेसच्या बैठकीलाही दांडी मारली. त्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने एक्शन मोडमध्ये येत विरोधी पक्षनेत्यांना (Michael Lobo) थेट पदावरून हटवलं. मात्र त्यानंतर बंडखोर आमदार आता पुन्हा आम्ही काँग्रेससोबतच आहे असे म्हणत आहेत. काँग्रेस नेतृत्वाने दिगंबर कामत आणि मायकल लोबो या दोन नेत्यांवर भारतीय जनता पक्षांसोबत संगनमत करून काँग्रेसला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कमकुवत करण्यासाठी कट रचल्याचा आरोप केला. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांनी ते अजूनही काँग्रेससोबत आहेत. पण त्यांच्यावरील आरोपांमुळे ते खूप दुखावले गेले आहेत, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“मी गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांची पत्रकार परिषद पाहिली आहे. ती पाहून मला धक्का बसला आहे, मी स्तब्ध झालो आहे आणि यामुळे मला अत्यंत वेदना झाल्या आहेत,” असे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील पक्षाचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत म्हणाले. रविवारी राज्याची राजधानी पणजी येथील काँग्रेस मुख्यालयात बैठकीला कामत हे उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याची खदखदही कामत यांनी बोलून दाखवली आहे.
त्याचप्रमाणे मायकल लोबो म्हणाले की शनिवारी संध्याकाळी काँग्रेस मुख्यालयात ते उपस्थित नव्हते कारण काँग्रेसच्या खूप सभा आणि पत्रकार परिषदा त्या दिवशी होत होत्या. तसेच खराब हवामानामुळे बाधित झालेल्या नुकसानभरपाईबाबत चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गेलो असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांना विरोधी पक्षनेतेपदावरून वगळण्याच्या पक्षाच्या निर्णयावर लोबो म्हणाले की त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती ही त्यांनीच केली होती. त्यामुळे आता मोठा संभ्रमही निर्माण झाला आहे.
रविवारच्या मोठ्या राजकीय हालचालींनंतर काँग्रेस मुख्यालयात केवळ पाच आमदार दिसले होते, तर लोबो आणि इतर तीन काँग्रेस आमदारांचा गट मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानात प्रवेश करताना दिसला होता आणि ते काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कातही नव्हते. त्यामुळेच हा गट बाहेरून सरकारला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू होत्या.