गोकुळचा संचालक व्हायचं असेल तर 10 लिटर दूध न दमता काढून दाखवा, राजू शेट्टींचं चॅलेंज
या निवडणुकीसाठी कोल्हापुरातील बड्या राजकीय नेत्यांची मुलं रिंगणात उतरली आहेत. | gokul dudh sangh election
कोल्हापूर: राज्यातील प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघाच्या (Gokul Dudh Sangh) निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केलेली एक मागणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संचालकपदाची निवडणूक लढवणाऱ्यांना एका दमात 10 लीटर दूध काढता, यायला हवं, अशी अट ठेवायला पाहिजे होती. या निवडणुकीसाठी कोल्हापुरातील बड्या राजकीय नेत्यांची मुलं रिंगणात उतरली आहेत. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी हा खोचक टोला लगावला. ( Raju Shetty Challange for Gokul dudh sangh election 2021)
सध्या गोकुळ दूध संघावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाची सत्ता आहे. मात्र, यंदा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावायचे ठरवले आहे. त्यासाठी सतेज पाटील विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे महादेवराव महाडिक हेदेखील सावध झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी सहकार आणि राजकीय क्षेत्रातील मातब्बर व्यक्तींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. महादेवराव महाडिक यांनी बुधवारी राजू शेट्टी यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी गोकुळ दूध संघ वाचवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सत्ताधारी गटासोबत राहावे, अशी विनंती राजू शेट्टी यांना केली.
अप्पा अण्णांच्या भेटीला, महादेवराव महाडिक कल्लाप्पाण्णा आवाडेंच्या घरी, राजकीय क्षेत्रात खळबळ
माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadev Mahadik) यांनी मंगळवारी सहकारमहर्षी आणि काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे (Kallappanna Awade), तसेच त्यांचे पुत्र – आमदार प्रकाश आण्णा आवाडे (Prakash Awade) यांची भेट घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक आणि आवाडेंची भेट झाल्याची माहिती आहे. मात्र या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या निवासस्थानी महादेवराव महाडिक यांनी सदिच्छा भेट घेतली. होती.
महादेवराव महाडिक यांचं कोल्हापुरात वर्चस्व
मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या महाडिक कुटुंबाने गेल्या तीन दशकांत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय, सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले. ताराराणी आघाडीच्या स्थापनेतून त्यांनी महापालिकेचं राजकारण ढवळून काढलं. तब्बल 18 वर्ष विधानपरिषदेवर निवडून येणाऱ्या महादेवराव महाडिक यांनी महापालिका, गोकुळ दूध संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा कृषी उत्पन्न समिती अशा प्रमुख संस्थांवर सत्ता गाजवली आहे.
पुतण्या धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीतून खासदार केलं, तर पुत्र अमल महाडिक यांना भाजपकडून आमदारकी मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. सून शौमिका यांना जिल्हा परिषद सदस्य बनवण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. मात्र 2016 मध्ये विधानपरिषद निवडणुकीत त्यांना एकेकाळचा राजकीय चेला असलेले काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. महाडिकांची भाजपशी जवळीक आहे. आता गोकुळ दूधसंघाच्या निवडणुका तोंडावर असल्याने आवाडेंच्या भेटीने महादेवराव कोणती राजकीय गणितं जुळवणार, याकडे लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :
काँग्रेसच्या सत्ताकाळात मंत्रिपद, कोल्हापुरातील दिग्गज नेत्याच्या भेटीला फडणवीस
काँग्रेसच्या बडे नेते कल्लाप्पाण्णा आवाडेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ
गोकुळ निवडणूक : सतेज पाटलांना धक्का, माजी आमदाराने चार दिवसात आघाडी सोडली
( Raju Shetty Challange for Gokul dudh sangh election 2021)