Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांच्यावर कर्जतमध्ये गुन्हा दाखल, धनगर संघटनांनीच का केली तक्रार? वाचा
समाजा-समाजात तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे, अशा विविध आरोपांचा समावेश आहे. कालच्या चौंडीतील भाषणानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात रविंद्र सखाराम पांडुळे असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यामुळे आता गोपीचंद पडळकरांच्या अडचणी किती वाढणार? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे.
अहमदनगर : मंगळवारी अहिल्यादेवी होळकरांची जयंत (Ahilyadevi Holkar) साजरी होत असतान कर्जतमध्ये झालेला राजकीय ड्रामा हा संबंध महाराष्ट्राने पाहिला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांना (Gopichand Padalkar) पोलिसांनी चौंडीत जाताना अडवलं आणि राजकीय वादाची ठिणगी पडली. दुसरीकडे चौंडीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावरही गोपीचंद पडळकर यांनी सडकडून टीका केली. तर राष्ट्रवादीने हा कार्यक्रम हायजॅक केला आहे, अशी टीका भाजपकडून झाली. मात्र आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कर्जतमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पडळकरांविरोधात काही धनगर संघटनांनीच तक्रार केली आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चांणा उधाण आहे. तर राष्ट्रवादीकडून पोलिसांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप पडळकर यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे.
कोणत्या आरोपांखाली तक्रार?
यात समाजा-समाजात तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे, अशा विविध आरोपांचा समावेश आहे. कालच्या चौंडीतील भाषणानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात रविंद्र सखाराम पांडुळे असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यामुळे आता गोपीचंद पडळकरांच्या अडचणी किती वाढणार? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे.
काल चौंडीत काय घडलं?
अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीसाठी अनेक नेते काल चौंडीत दाखल होत होते. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून यंदा जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावर गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल चढवला होता. रोहित पवारांना आत्ताच कशा अहिल्यादेवी आठवल्या, रोहित पवार काय अहिल्यादेवींचे वंशज आहेत का? असा सवाल पडळकरांकडून वारंवार विचारण्यात येत होता. मात्र काल पडळकर जयंती साजरी करण्यासाठी चौंडीत जाताना त्यांना आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवलं आणि हा वाद पेटला.
पोलिसांनी अडवल्यानंतर पडळकर आक्रमक
पोलिसांनी रोखल्यानंतर पडळकर आणि खोत चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी सरकार आणि राष्ट्रवादीवर टीकेची झोड उडवली. राष्ट्रवादीच्या दबावाखाली पोलीस खातं काम करत आहे. तसेच रोहित पवार यांना कार्यक्रम घ्यायला परवानगी मिळते मात्र आम्हाला तिथे जातानाही अडवलं जातं, हा कुठला न्याय आहे, असा सवाल पडळकरांकडून विचारण्यात आला. तसेच त्यांनी इतरही विविध मुद्द्यांवरून पवारांना टार्गेट केले. त्यानंतर आज काही धनगर संघटनांच्या त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आता प्रकरण कुणीकडे जाणार? हे येणारे दिवसच सांगतील.