धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर यांनी दंड थोपाटले; सोमवारी राज्यभरात रास्तारोको करणार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार आंदोलन सुरू केलेलं असतानाच आता भाजप आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनीही दंड थोपाटले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणासाठी राज्यात सोमवारी चक्काजाम करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.
राज्यात धनगर आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण हवं आहे. मात्र, त्याला आदिवासी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे दोन्ही समाज आमनेसामने आले आहेत. दोन्ही समाजाने आता सरकारवर दबाव वाढवण्याचं काम सुरू केलं आहे. उपोषणे सुरू आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा वाद पेटल्याने सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यातच आता धनगर समाजाचे नेते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणासाठी दंड थोपाटले आहेत. पडळकर यांनी थेट सोमवारी राज्यव्यापी रास्तारोको करण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. काही आमदार आणि नेते सातत्याने आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत. आंदोलन करत आहेत. मुंबईला येणारं पाणी अडवण्याची भूमिका आता त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आताच ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. राजकिय हेतूने प्रेरित होऊन जर कुणी राजकारण करत असेल तर अभी नही तो कभी नहीं, असा इशारा देतानाच राज्यात सोमवारी सकाळी 11 वाजता मोठा रास्ता रोको करा, असं आवाहनच गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
पंढरपूर, लातूरमध्ये उपोषण
ऊपवर्गिकरण करण्यास मान्यता दिली पण सरकार वेळ काढू पण करत असेल तर ही गंभीर बाब आहे. जीआरबाबत सरकारने भूमिका घेतली पाहिजे, असं सांगतानाच पंढरपूर आणि लातूरमध्ये आमची उपोषणं सुरू आहेत. आता आम्ही सोमवारी रास्ता रोको करणार आहोत. शांततेच्या मार्गानेच रास्ता रोको करणार आहोत, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
आधी म्हणायचे र चं ड झालंय
आधी म्हणायचे की र चं ड झालंय. पण आता आरक्षण देण्यास विलंब लागतोय. राज्य सरकारने एफिडेव्हिट दिलंय की धनगड हे राज्यात अस्तित्वात नाहीत. खिलारे या धनगर समाजाच्या पाच जणांना धनगड सर्टिफिकेट मिळालं हे दुर्दैव, असंही ते म्हणाले.
जीआर काढा
आम्ही एसटी प्रवर्गाचे दाखले द्या अशी मागणी केली होती. हायकोर्टात ही लढाई ताकदीने लढली गेली. धनगर जमातीच्या लोकांना धनगडचे दाखले काढले म्हणून याचिका रद्द झाली. आता सरकारने जीआर काढावा, एसटीचा दाखला द्यावा, 6 महिन्यापासून उपोषण, आंदोलन सुरू आहे. काल समितीची, रविवारी मुख्यमंत्री आणि आजही बैठक झाली. सगळी कागदपत्रं दिली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.