मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी बारामतीतल्या झाडांवर कुऱ्हाड
मुख्यमंत्र्यांच्या यात्रेतील विशेष रथास या ठिकाणच्या झाडांचा अडथळा होऊ नये म्हणून प्रशासनाने झाडांवर कुऱ्हाड चालवली (Baramati Tree cutting) आहे.
बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेली भाजपची महाजनादेश यात्रा उद्या बारामतीत (Maha-Janadesh Yatra in Baramati) पोहोचणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेतील विशेष रथास या ठिकाणच्या झाडांचा अडथळा होऊ नये म्हणून प्रशासनाने झाडांवर कुऱ्हाड चालवली (Baramati Tree cutting) आहे. गेल्या वर्षांनुवर्षे रस्त्यांच्या दुतर्फा ही झाडे उभी असून उन्हाळ्यात अनेक पादचारी या झाडांच्या सावलीत बसतात. मात्र महाजनादेश यात्रेच्या रथात मुख्यमंत्री झाकले जाऊ नये यासाठी प्रशासनाने चक्क झाडांवरच कुऱ्हाड (Baramati Tree cutting) चालवली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश दौऱ्यात त्यांचे रथ सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. याच रथामध्ये बसून मुख्यमंत्री आपल्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना हात दाखवून अभिवादन करत असतात. या रथामध्ये त्यासाठी विशेष अशी लिफ्ट देखील बसवण्यात आली आहे. पण जर त्यातून मुख्यमंत्री दिसले नाही, तर मग इतक्या आकर्षक रथाचा काय उपयोग? याच उद्देशाने प्रशासनाने ही झाडे कापली ((Baramati Tree cutting) असावी असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान एकीकडे शासन आणि प्रशासनाकडून वृक्षसंवर्धनाचे सल्ले दिले जातात. झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा देखील दिल्या जातात. पण दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा हा रथ झाकला जाऊ नये म्हणून या झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा आदेश सरकार देते.
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अशा अजून किती झाडांचा बळी जाणार आहे असा प्रश्न वृक्षप्रेमींनी उपस्थित केला आहे.