मुंबई: भाजपने सत्तास्थापनेला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी (Governor invite Shivsena to Form Government) दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला निमंत्रण दिलं आहे. आता सत्तास्थापनेसाठी शिवसेना दावा करणार का आणि बहुमताचा आकडा कसा जमवणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजही (10 नोव्हेंबर) मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं म्हणत तडजोड करण्यास नकार दिला. त्यामुळे सर्वांचेच लक्ष शिवसेनेकडे लागले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेकडून उद्या (11 नोव्हेंबर) सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत सत्तास्थापनेविषयी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील 24 तास राज्यात सत्तास्थापनेविषयीच्या घडामोडींना प्रचंड वेग येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करुन चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीत जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास… (Shivsena Options for Government Formation)
पर्याय 1
शिवसेना- अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + काँग्रेस (44) + राष्ट्रवादी (54) = 162
बविआ (3) + समाजवादी पक्ष (02) + स्वाभिमानी (01) = 162+06 = 168
बहुमताचे संख्याबळ – 145
पर्याय 2
राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि काँग्रेस तटस्थ राहिली तर
सभागृहाचे संख्याबळ 288 वजा 44 = 244
शिवसेना – अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + राष्ट्रवादी (54)+ काँग्रेस समर्थक अपक्ष (04) = 122
बहुमताचे संख्याबळ – 123
काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. आपल्याला जनादेश नसल्याचं सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस आमदारांनी सेनेला पाठिंबा देण्यास सकारात्मकता दर्शवली असली, तरी अंतिम निर्णय हा हायकमांड सोनिया गांधी यांचा असेल. भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी सेनेला पाठिंबा देण्याची खेळी काँग्रेस-राष्ट्रवादी खेळू शकते, अशी चर्चा आहे.