सर्वात मोठी बातमी | राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राजीनामा देणार… पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली ‘ही’ विनंती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी यासंदर्भातील इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्लीः महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. राज्यपाल (Maharashtra Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे त्यांनी यासंदर्भातील इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मुंबईत येऊन गेले. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल सतत अवमानकारक वक्तव्ये आणि राज्यपाल पदाचा गैरवापर केल्याचा आरोप भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सातत्याने झाला आहे. राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी महाविकास आघाडीने लावून धरली आहे. आता राज्यपालांनीच स्वेच्छेने राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याने राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. जीवनाचा उर्वरित काळ चिंतन तसेच मननात घालविण्याचा मानस पंतप्रधानांना कळविल्याची दिली माहिती समोर आली आहे.
नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.
राज्यपालांचं मनोगत काय?
“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही.
माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
वादग्रस्त कारकीर्द
मागील चार वर्षांपासून भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आहेत. मात्र सतत वादग्रस्त वक्तव्यावरून ते चर्चेत राहिले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी असो किंवा राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्या असो… राज्यपालांची ही वादग्रस्त कृती तसेच छत्रपती शिवाजी महराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंबाबत केलेली आक्षेपार्ह वक्तव्ये.. यामुळे राज्यपाल विरोधकांच्या सतत निशाण्यावर राहिले.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या सत्तांतरातही राज्यपालांची भूमिका संशयास्पद असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतेय.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून महाविकास आघाडीने राज्यपालांविरोधात महाराष्ट्रभर आंदोलन उभं केलं होतं. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांना पदावरून हटवण्याची जोरदार मोहीम उघडण्यात आली होती. तसेच राज्यपालांविरोधात भाजप कारवाई का करत नाही, यावरून प्रश्नचिन्हही उभं करण्यात आलं होतं.