मराठा आरक्षणावर सरकारकडून सरळ सरळ फसवणूक : शरद पवार
विजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्दावरुन सरकार सरळ सरळ फसवणूक करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. कोल्हापुरात ते आज पत्रकारांशी बोलत होते. 1 डिसेंबरला पाहू सरकार नेमकं काय निर्णय घेतं. मराठा आरक्षणाचा फायदा निवडणुकीत होईल असं सरकारला वाटत असेल, पण तसं होणार नाही असंही पवार म्हणाले. समाजासमाजात […]
विजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्दावरुन सरकार सरळ सरळ फसवणूक करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. कोल्हापुरात ते आज पत्रकारांशी बोलत होते. 1 डिसेंबरला पाहू सरकार नेमकं काय निर्णय घेतं. मराठा आरक्षणाचा फायदा निवडणुकीत होईल असं सरकारला वाटत असेल, पण तसं होणार नाही असंही पवार म्हणाले.
समाजासमाजात दरी निर्माण करण्याचं काम हे सरकार करत असून राज्याच्या एकतेवर याचा परिणाम होताना दिसत असल्याचं पवारांनी यावेळी म्हटलं. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने नेमलेल्या समितीवरही पवारांनी टीका केली.
कोणी जिल्हा परिषद आणि महापालिका नगरसेवक फोडून कर्तृत्व निर्माण केले, म्हणजे समाजाला दिशा देण्याचे काम करेल असे नाही, असं म्हणत पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या चलो अयोध्या मुद्द्यावरही पवारांनी भाष्य केलं.
निवडणुका जवळ आल्या की राम मंदिराचा मुद्दा काढला जातो. अशा मुद्द्यांचा एकदाच वापर होतो वारंवार होत नाही, अशी टीका पवारांनी शिवसेनेवर केली. गेल्या साडे चार वर्षात सांगण्यासारखं काम केलं नाही म्हणून धर्माचा आधार घेतला जातोय, अशी टीकाही पवारांनी केली.
जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाचा पवारांनी निषेध केला. शिवाय असे राजकारण देशासाठी घातक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये 40 जागांवर एकमत झाले असून, भाजपविरोधात प्रत्येक राज्यात मोट बांधण्याचं काम सुरु झाल्याचं पवारांनी सांगितलं.
देशात एक आघाडी नाही तर प्रत्येक राज्यात वेगवेगळी मोट बांधून भाजपला विरोध करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत. याच संदर्भात 10 डिसेंबर रोजी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचंही पवारांनी सांगितलं.