मुंबई : पुणे पदवीधर आणि शिक्षक, तर नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसाला आहे. नागपूर (Nagpur Graduate Constituency Election) आणि पुणे पदवीधर (Pune graduate constituency election) हे भाजपचे हक्काचे असणारे मतदारसंघ या निवडणुकीत त्यांच्या हातून निसटताना पाहायला मिळत आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी विजयी गुलाल लावलाय. तर नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरुद्ध एकटा भाजप अशा झालेल्या या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. (graduate-teacher constituency election results says opinion of the people of Maharashtra has changed : Shambhuraj Desai)
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण झालंय, तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. शंभूराज देसाई म्हणाले की, “विधान परिषद निवडणुकीत मिळालेला विजय हा महाविकास आघाडीचा एकत्रित विजय आहे. हा महाविकास आघाडीच्या विचारांचा विजय आहे. भारतीय जनता पक्षाला पदवीधर शिक्षक आणि मतदारांनी नाकारले आहे. दरम्यान अमरावतीचा उमेदवार कसा पडला? याचे निश्चितच मूल्यांकन केले जाईल. दरम्यान या निवडणुकीच्या निकालांवरुन एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, राज्यातील जनतेचा मतप्रवाह बदलतोय”. चंद्रकांत पाटलांबाबत बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, “त्यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा कोणाला फायदा झाला याचं विचार करू नये”.
दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण झालं आहे. तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली आहे, असं वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेला एकप्रकारे सूचक इशाराच दिला आहे. तर पुण्यात आणि नागपुरात अपक्ष उमेदवाराने अजून काही मतं घेतली असती तर विजय आमचाच होता, असं म्हणत पाटील यांनी आपला पराभव मान्य केला आहे.
अरुण लाड यांना विजयी गुलाल
पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना धूळ चारत विजय मिळवला आहे. अरुण लाड यांना 1लाख 22 हजार 145 मतं मिळाली आहेत. तर भाजपचे संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मतांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे अरुण लाड यांनी देशमुखांवर तब्बल 48 हजार 824 मतांनी विजय मिळवला आहे.
बालेकिल्ल्यातही भाजपला धक्का
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील प्रतिनिधीत्व केलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडी पर्यायानं काँग्रेसचे उमेदवार अभिजत वंजारी यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. मात्र, विजयी होण्याचा कोटा असलेली 60 हजार 747 मतं त्यांना मिळाली नाहीत. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु झाली आहे.
पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये अभिजित वंजारी यांना 55 हजार 947 मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 41 हजार 540 मतांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे अभिजित वंजारी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मानला जात असताना, अभिजित वंजारी यांचा विजय हा विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का मानला जात आहे.
संबंधित बातम्या
जिथे चंद्रकांत पाटील सलग जिंकले, तिथे संग्राम देशमुख कसे हरले?