मोदींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचीही उपस्थिती?
बडोदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ला गुजरातमधील बडोदा आणि उत्तर प्रदेशातील वाराणसीतून निवडणूक जिंकली होती. बडोदा हे नाव घेतलं की सयाजीराव गायकवाड यांची आठवण होते. पुरोगामी विचार जोपासणारा हा जिल्हा गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. 2014 ला मोदी मोठ्या फरकाने जिंकले. याचं कारण बडोदा हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे […]
बडोदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ला गुजरातमधील बडोदा आणि उत्तर प्रदेशातील वाराणसीतून निवडणूक जिंकली होती. बडोदा हे नाव घेतलं की सयाजीराव गायकवाड यांची आठवण होते. पुरोगामी विचार जोपासणारा हा जिल्हा गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. 2014 ला मोदी मोठ्या फरकाने जिंकले. याचं कारण बडोदा हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे गुजरातमधील भाजपाच्या ज्या टॉप 10 जागा आहेत, त्यात बडोदा हे एक नाव आहे. यंदा बडोद्यात काँग्रेसने मतदारसंघात चांगलंच आव्हान निर्माण केलं आहे. त्याचं श्रेय जातं ते काँग्रेसचे तरूण उमेदावार प्रशांत पटेल यांना. त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला काही भाजपचे तरूणही हजर होते असं सांगितलं जातंय.
प्रशांत पटेल यांच्यासमोर भाजपकडून रजनबेन भट्ट या उमेदवार आहेत. त्या तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. कामाचा चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. मागच्या वेळी मोदी लाटेत त्या सहज निवडून आल्या होत्या.
बडोदा मतदारसंघातील चित्र
रावपुरा, शहरवाडी, अकोटा, मांजलपूर, सावली आणि वाघोडिया हे विधानसभा मतदारसंघ बडोद्यात येतात. हे विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. बडोदा इथे मराठी टक्काही चांगला आहे. जिल्ह्याचे चार प्रश्न लोकसभा निवडणुकीत महत्वाचे ठरू शकतात. बडोदा शहराचं व्यवस्थापन, नागरिकांना मिळणारं गढूळ पाणी, रस्त्याची दुरावस्था आणि शिक्षणाचं बाजारीकरण. या सर्व प्रश्नांवर काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केलाय.
जाणकारांच्या मते, बडोद्यात नगर परिषद निवडणुका या मुद्यांवर होत असतात. पण लोकसभेला मात्र हे सर्व मुद्दे बाजूला पडतात आणि धर्माचं राजकारण पुढे केलं जातं. प्रशांत पाटील हे एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेत काम करायचे. बडोदा विद्यापीठात त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी एक सहानुभूती पाहायला मिळते.
भाजप आणि काँग्रेसच्या जमेच्या बाजू
दुसरीकडे प्रशांत पटेल यांच्यासमोर रंजनबेन भट्ट या अनुभवी उमेदवार आहेत. सलग तिसऱ्यांदा त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये त्या निवडून आल्या असल्या तरी आरएसएसची परंपरागत मतं विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि खुद्द भाजपा अशी मोठी वोट बँक त्यांच्याकडे आहे.
अनुभवी रंजनबेन यांच्यासमोर काँग्रेसचा टिकाव लागणार नाही हे काँग्रेसलाही माहित आहे. पण कार्यकर्त्यांनाही यंदा काही तरी बदल होईल अशी अपेक्षा आहे.
भाजपचं प्रयोग केंद्र
बडोदा हे देशातील भाजपचं प्रयोग केंद्र असल्याचं म्हटलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला किंवा भाजपला समजा एखादा नवीन प्रयोग करायचा असेल तर पहिल्यांदा इथं केला जातो. त्याची बडोद्यात जी प्रतिक्रिया येते, त्यातून हा प्रयोग देशात राबवायचा की नाही हा निर्णय घेतला जातो, असं जाणकार सांगतात. रंजनबेन यांना ही निवडणूक सोप्पी आहे. पण पटेलही चांगलं आव्हान देतील असं जाणकारांचं मत आहे.
प्रशांत पटेल यांचा अजून खोलवर प्रचार सुरू झालेला नाही. पण रंजनबेन यांचा प्रचार मात्र प्रत्येक बूथवर पाहायला मिळतोय. त्यामुळे बडोदा इथे काँग्रेसला भाजपाशी लढण्यासाठी खुप जास्त मेहनत करावी लागेल हे नक्की आहे.