खासदार आमदाराकडून वेगवेगळं स्वागत, आदित्य ठाकरेंसमोरच शिवसेनेची गटबाजी उघड
बुलडाण्यातील शिवसेनेचा (Shivsena) अंतर्गत वाद हा काही नवीन नाही, मात्र हा वाद थेट शिवसेना नेते आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांच्यासमोरच उघड झाला आहे.
बुलडाणा : बुलडाण्यातील शिवसेनेचा (Shivsena) अंतर्गत वाद हा काही नवीन नाही, मात्र हा वाद थेट शिवसेना नेते आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांच्यासमोरच उघड झाला आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या बुलडाण्यातील जनआशीर्वाद यात्रेदरम्यान (Aditya Thackeray Buldana) त्यांचे स्वागत दोन गटांनी स्वागत केले. आदित्य ठाकरे यांच्या बुलडाण्याच्या खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्या गटाने स्वागत सभा आयोजित केली, तर दुसरीकडे माजी आमदार विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) गटाने शहराबाबाहेर जंगी स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी आदित्य ठाकरे हे भावी मुख्यमंत्री म्हणून विद्यार्थ्यांनी स्वागत फलक ही आणले होते. यामुळे बुलडाण्यात शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान (Jan Aashirwaad Yatra) दोन गटांचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले.
बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा (Aditya Thackeray Buldana) आयोजित करण्यात आली होती. बुलडाण्यात एका सवांद सभेनंतर ही जनआशीर्वाद यात्रा चिखली येथे जाणार होती. त्या दरम्यान बुलडाण्याच्या गांधी भवन परिसरात सवांद सभा झाल्यावर ही यात्रा बुलडाणा शहराबाहेर येळगाव फाट्यावर पोहचली. त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या ठिकाणी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
तर बुलडाण्यात खासदार प्रतापराव जाधव यांच्या जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांनी हे आयोजन केले. या खासदार गटाने संपूर्ण शहरात डिजिटल फलक लावून आदित्य ठाकरे चे स्वागत केले. तर माजी आमदार शिंदे यांनी डिजिटल बॅनर लावले. तसेच आदित्य ठाकरे हे भावी मुख्यमंत्री चे फलक झळकावून जन आशीर्वाद यात्रेचे स्वागताचे क्रेडिट घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याशिवाय भविष्यात आदित्यच्या रुपाने मुख्यमंत्री पाहायचा ही इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.
या दोन्ही कार्यक्रमाच्या दरम्यान पहिल्या सभेच्या ठिकाणी खासदार प्रतापराव जाधव सह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मात्र येथे बुलडाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे हे उपस्थित नव्हते. तर दुसऱ्या ठिकाणी गावाबाहेर झालेल्या येळगाव फाट्यावरील स्वागत सभेच्या मंचावर आदित्य ठाकरे यांच्यासोबत बुलडाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदेसह राज्यमंत्री संजय राठोड हे हजर होते. तर जिल्ह्याचे खासदार हे आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या गाडीत आले. मात्र स्टेजवर जाताना स्टेजवरील लोकांच्या पाठीमागे उभे राहीले. तर जिल्ह्यातील शिवसेनेचा एकही विद्यमान पदाधिकारी उपस्थित नव्हता. यावरुन जिल्ह्यातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
नेमका वाद काय?
बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विजयराज शिंदे हे गेल्या 3 टर्मपासून बुलडाण्याचे आमदार आहेत. शिवसेना उदयास आली तेव्हापासून शिंदे यांनी शिवसेना पक्षात सामान्य कार्यकर्ता ते आमदार म्हणून काम केले. त्यामुळे शिंदे यांना शिवसेनेतील अनेक नेते ओळखतात आणि मातोश्रीवर त्यांचे चांगले वजन ही आहे.
मात्र माजी आमदार विजयराज शिंदे हे 2009 ते 2014 दरम्यान आमदार असताना खासदार प्रतापराव जाधव यांच्यात काही कारणास्तव बिघडले. ते आजपर्यंत जुळलेच नाही. भलेही दोघेही एकाच पक्षात असले, मात्र निखाऱ्यातील विस्तवाप्रमाणे दोघेही आहेत. या दोघांच्या वादामुळे जिल्हातील शिवसेनेत 2 गट पडले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनासह सर्वच पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढविली. तोपर्यंत जाधव यांनी मेहकर मतदारसंघ सोडून बुलडाणा विधानसभामध्ये आपले वजन वाढवायला सुरुवात केलेली होती. तो फायदा जाधव यांनी 2014 च्या निवडणुकीवेळी घेतला. त्यानंतर शिंदे यांच्याजवळील अनेक पदाधिकाऱ्यांना दूर करण्यास जाधव यानी सुरुवात केली. इतकंच नव्हे तर शिंदे याना एकटे पाडून पदाधिकाऱ्यांची नियुक्तीसुद्धा जाधव यांनी आपल्याकडे घेत मर्जीतील लोकांना पदे वाटली.
त्यामुळे विजयराज शिंदे हे एकटे पडले आणि 2014 च्या निवडणुकीत शिंदे यांच्याविरोधात जाधव गटाने छुपा प्रचार केला. तेव्हापासून खासदार प्रतापराव जाधव आणि विजयराज शिंदे यांचे आणखी बिघडले. एकमेकांचे तोंड सुद्धा पाहणे सहन होत नाही, कोणीही कोणाच्या कार्यक्रमात जात नाहीत.
मात्र, खासदार असल्याने जाधव यांचे पक्षात अधिक वजन आहे. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख पदासह संपूर्ण पदे त्यांनी आपल्या मर्जीतील लोकांना वाटतर जिल्ह्यातील शिवसेना ताब्यात घेतली. यामुळे माजी आमदार विजयराज शिंदे हे एकटे पडले. त्यांच्याजवळील कार्यकर्त्यांना चांगली पदे देत खासदार यांनी शिवसेना बुलडाण्यात मजबूत केली. त्यातही काही पदाधिकाऱ्यांना तर विधानसभाच्या तिकिटाचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड सह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते मतदार संघात कामालाही लागले आहेत.
मात्र तब्बल 3 वेळा आमदार राहिलेलं विजयराज शिंदे हे शांत बसतील तर नवलंच. शिंदे यांनीही मतदार संघात आपण निवडून येणार म्हणून तयारी करत तिकीटासाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरु केली. खासदार जाधव यांचा गट विधानसभेची तयारी करतोय तर दुसरीकडे शिंदे स्वतः तयारी करतात. त्यामुळे बुलडाण्यात गटबाजी नेहमीच पाहायला मिळतेय. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हयात आयोजित केलेल्या आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत उघड उघड गटबाजी पाहायला मिळाली.