वंचितला सत्ता द्या, जीएसटीमध्ये सुधारणा करु : प्रकाश आंबेडकर
वस्तू व सेवा कर प्रणाली म्हणजेच जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त आहेत, वंचितला सत्ता द्या, त्यामध्ये आम्ही सुधारणा करु, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करता येईल, असं प्रकाश आंबेडकर (GST Prakash Ambedkar) म्हणाले.
यवतमाळ : बँकांची अवस्था, आर्थिक मंदी आणि राजकीय परिस्थिती अशा विविध मुद्द्यांवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा समाचार घेतला. वस्तू व सेवा कर प्रणाली म्हणजेच जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त आहेत, वंचितला सत्ता द्या, त्यामध्ये आम्ही सुधारणा करु, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करता येईल, असं प्रकाश आंबेडकर (GST Prakash Ambedkar) म्हणाले. शिवाय मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या सगळ्या नेत्यांना बाहेर करुन टाकलंय, असं म्हणत त्यांनी (GST Prakash Ambedkar) देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
“जीएसटीतून सुटका करा अशी मागणी घेऊन एक शिष्टमंडळ भेटायला आलं होतं. पण त्यांना सांगितलं, संधी होती तेव्हा तुम्ही काही केलं नाही आणि भाजपला मत दिलं. आता विधानसभा निवडणुका येत आहेत. वंचितला सत्ता द्या, जीएसटीमध्ये सुधारणा करु. महिन्याला हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा… यापेक्षा आयटीची सुधारित पद्धत आणली जाऊ शकते,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी व्यापारी वर्गावरही निशाणा साधला. “व्यापारी वंचितसोबत येत नाहीत. त्यांनी भाजपसोबत लग्नच केलं आहे. पण व्यापाऱ्यांनी भाजपशी काडीमोड घेऊन वंचितसोबत यावं. भाजपचं सरकार पुन्हा आलं तर राष्ट्रीय बँकाही बुडतील,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“एका धर्म वेड्या माणसाला एवढंच सांगतो की माणसं नीती नियमाने चालतात की नाही हे पाहा.. धर्माची राजवट आणली, गेल्या पाच वर्षांपासून आपण बोलायला लागलो की राष्ट्रवाद जागा होतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रवादाचं नाटक केलं. त्यांना सुखोई 31, 35 आणि राफेल यातला फरक तरी कळतो का?, असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी केला.
“राफेल घेताना त्याच्या चाकाखाली लिंबू ठेवायचं आणि त्याला भारतीय संस्कृती म्हणायचं. याचे परिणाम लक्षात आले का? राजनाथ सिंहला विचारतो की किती देशाचे विमान आपण वापरतो? तुम्ही एका देशाचं विमान घेताना लिंबू ठेवलं, मग बाकीच्यांनीही विचारलं तर काय करणार? आंतरराष्ट्रीय बाजारात आवड-नावड होऊ शकत नाही,” असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“हिंदू राष्ट्रवाद आणि धर्मवाद आपल्याला मातीत घेऊन चाललाय. या राष्ट्रवादाने बँका बुडत आहेत. चार बँकेची मिळून एक बँक करणार असं म्हणतात. म्हणजेच बाकीच्या बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातात. बँक बुडणार म्हणून त्याचं विलिनीकरण केलं जातंय का?” असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला.