मुंबई : काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हार्दिक पटेलांची लढतही रंगतदार (Gujarat Election 2022) होणाराय. अहमदाबादमधल्या वीरमगाम मतदारसंघात हार्दिक पटेल (Hardik Patel) मैदानात आहेत. त्यांचा मुकाबला काँग्रेसचे लाखा भरवाड यांच्याशी होतोय. मागच्या दोन टर्मपासून इथं काँग्रेसचा आमदार आहे. त्यामुळे यंदा हार्दिक पटेल जिंकणार का, हे पाहणं महत्वाचं आहे. वीरमगाम विधानसभा हा पटेलांचा गड मानला जातो. म्हणूनच भाजपनं हार्दिक पटेलांना उमेदवारी देऊन विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. वीरमगाम मतदारसंघात 55 हजार मतं ठाकूर समाजाची, 50 हजार मतं पटेलांची, तर दलित समाजाची मतं 25 हजारांच्या घरात आहेत.
2017 च्या तुलनेत गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात, यंदा 5 टक्के मतदान कमी झालंय. यावर्षी 63.31 टक्के मतदान झालं. 2017 मध्ये हा आकडा 69.2 टक्के होता. मागच्या ३ पंचवार्षिक निवडणुकांचा अभ्यास केल्यास मतदान कमी झाल्याचा फटका भाजपला बसला आहे.
भाजपनं यावेळी 39 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलंय. आणि 2017 मध्ये काँग्रेसकडून लढलेल्या आणि नंतरहून भाजपमध्ये आलेल्या 7 नेत्यांना भाजपनं तिकीटं दिली आहेत. दरम्यान, एकूण 14 महिलाही भाजपकडून भविष्य आजमावतायत.
मोरबी पूल दुर्घटनेमुळे भाजपनं या मतदारसंघात कांती अमृतिया यांना मैदानात उतरवलंय. याआधी इथं ब्रजेश मेरजा आमदार होते. मात्र पूल दुर्घटनेवेळी कांती अमृतिया बचावकार्यात आघाडीवर राहिले. दरम्यान मोरबीचा निकाल काय लागतो., याकडेही सर्वांच्या नजरा आहेत
विजय रुपानी, नितीन पटेलांसहीत अनेक दिग्गजांना यावेळी भाजपनं निवडणुकीच्या प्रत्यक्ष लढतीपासून लांब ठेवलं. याआधीच या नेत्यांनी निवडणूक न लढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे भाजपनं यावेळी विजय रुपानी आणि नितीन पटेलांना उमेदवारी दिलेली नाही.
घराणेशाहीचं प्रतिनिधीत्व करणारे एकूण 21 उमेदवार गुजरातच्या रिंगणात आहेत. काँग्रेसनं 13 तर भाजपनं 7 जणांना उमेदवारी दिलीय. या 21 उमेदवारांचे वडील विद्यमान किंवा गुजरातचे माजी आमदार राहिले आहेत.
भाजपमधून काँग्रेसमध्ये घरवापसी झालेल्या महेंद्रसिंग वाघेला बयाड मतदारसंघातून लढलेयत.. महेंद्रसिंह वाघेला हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांचे पुत्र आहेत. 2017 नंतर वाघेला काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. मात्र २ महिन्यांपूर्वी ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्यामुळे काँग्रेसनं त्यांना तिकीट दिलंय.
मुलाच्या विजयासाठी स्वतः शंकरसिंह वाघेला बायड विधानसभेत तळ ठोकून होते. वाघेलांचं वर्चस्व टिकून असलं. तरी दलबदलू नेत्यांमुळे बायड मतदारसंघात चमत्कारिक निकालाची शक्यता आहे. अपक्ष आणि बंडखोरांमुळे अनेक मतदारसंघात डोळे विस्फारणारे निकाल
लागण्याचं बोललं जातंय.
गुजरात निवडणुकीत असे 7 उमेदवार रिंगणात आहेत, जे मागच्या 25 वर्षांपासून जिंकत आले आहेत. म्हणजे जवळपास 90 च्या दशकापासून 7 मतदारसंघात एकच आमदार राहिलाय. या 7 पैकी 5 आमदार भाजपचे तर इतर 2 आमदार अक्षपांचे आहेत
योगेश पटेल हे गुजरात निवडणुकीतले सर्वात वृद्ध उमेदवार आहेत. त्यांचं वय 76 आहे. पंच्च्याहत्तरी ओलांडलेल्यांना तिकीट नाही., असा भाजपचा नियम आहे. मात्र योगेश पटेलांच्या लोकप्रियतेमुळे भाजपनं त्यांना मैदानात उतरवलंय. मांजलपूरमधून लढणारे योगेश पटेल 5 वेळा आमदार राहिले आहेत.
गुजरातच्या निकालानंतर केजरीवालांच्या आम आदमीला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळण्याची दाट चिन्हं आहेत. गुजरातेत आपचे जर २ हून अधिक आमदार जिंकले, किंवा ७ टक्क्यांहून जास्त मतदान मिळालं., तर निकषानुसार आप राष्ट्रीय पक्ष होणार आहे.
2017 मध्ये आपनं 29 जागा लढवल्या होत्या. मात्र सर्व जागांवर आप पराभूत झाली. पाच वर्षांपूर्वी गुजरातमध्ये आपला फक्त 0.2 टक्के मतदान मिळालं होतं. त्यामुळे यावेळी आपला किती मतदान मिळतं, याकडे लक्ष लागलंय.
गुजरात विधानसभेत ओवैसींची एमआयएम यंदा पहिल्यांदाच भविष्य आजमावतेय. ओवैसींनी एकूण 13 ठिकाणी एमआयएमचे उमेदवार उभे केले आहेत. ओवैसींनी सर्व उमेदवार मुस्लिमबहुल भागातच उतरवल्यामुळे काँग्रेसला फटका बसण्याचा अंदाज आहे
गुजरातच्या ६ कोटी लोकसंख्येत 58 लाख लोकसंख्या मुस्लिमांची आहे. 182 जागांपैकी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 35 हून जास्त जागांवर मुस्लिम मतं निर्णायक ठरतात.
काँग्रेसकडून यंदा गुजरातमध्ये 6 तर आपनं 3 मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. भाजपकडून मात्र एकही मुस्लिम उमेदवार रिंगणात नाहीय. याआधी 1998 साली भाजपनं भरुच जिल्ह्यातून एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं होतं.
अहमदाबादमधल्या घाटलोडिया मतदारसंघात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांचा फैसला होणाराय. गुजरातच्या महत्वपूर्ण लढतींपैकी ही एक लढत आहे. इथं काँग्रेसनं राज्यसभा खासदार अमी याग्निक यांना तिकीट दिलंय
गुजरातमध्ये मोठं बहुमत विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांच्या यापुढच्या वाटचालीसाठी आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वी विजय रुपानींना हटवून पटेल मुख्यमंत्री झाले. गुजरात मोदी-शाहांनतर भूपेंद्र पटेल तिसरे मोठे नेते मानले जातात. सर्व्हेंमधून भाजपला स्पष्ट बहुमत मिळतंय. मात्र बहुमताचे आकडे कमी झाल्यास भुपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची धोक्यात असल्याचं सांगितलं जातंय.
जामनगरमध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेचाचीही लढत रंगतदार होईल. रवींद्र जडेजानं पत्नीकडून तर त्याची बहिण आणि वडिलांनी काँग्रेस उमेदवाराकडून प्रचार केलाय.काँग्रेसनं जामनगरमध्ये बिपेन्द्र सिंह जाडेजा यांना उमेदवारी दिलीय.
गुजरातमध्ये यंदा अपक्षांची संख्या वाढणार का, याकडेही लक्ष आहे. याआधी 1995 मध्ये एकूण 16 अपक्ष जिंकले होते.. 2002 नंतर गुजरातमध्ये फक्त १ ते ३ च्या दरम्यान अपक्ष उमेदवार जिंकले आहेत. मात्र यंदा 19 भाजप नेत्यांनी बंडखोरी केल्यामुळे अपक्षांचा आकडा वाढण्याचं बोललं जातंय.