गुजरातमध्ये काय घडलं? भर सभेत केजरीवाल यांच्यासमोर मोदी-मोदी… घोषणा, उत्तरही चोख!!
182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेसाठी डिसेंबर 2022 मध्ये मतदान होत आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात हे मतदान होईल.

अहमदाबादः विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधलं (Gujrat Assembly Election) वातावरण चांगलंच तापलंय. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पूर्ण ताकद पणाला लावलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात (Narendra Modi) केजरीवाल यांचा प्रचार सुसरु आहे. रविवारीही असाच प्रचार सुरु होता. अरविंद केजरीवाल यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता.
गुजरातमधल्या नवसारी जिल्ह्यातील चिखली येथे हा कार्यक्रम होता. केजरीवाल यांची सभा ऐकण्यासाठी चांगलीच गर्दी जमली होती.एवढ्यात नागरिकांमधून मोदी-मोदी… अशा घोषणा सुरु झाल्या.
भाषणादरम्यान अशा प्रकारे झालेल्या घोषणेमुळे आपचे संयोजक अरविंद केजरीवाल अजिबात विचलित झाले नाहीत. या घोषणा देणाऱ्या लोकांना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही खुशाल घोषणा द्या. पण तुमच्या मुलांसाठी शाळा आणि मोफत वीज मीच देणार आहे. मोदींच्या बाजूने घोषणा देणाऱ्या लोकांचं मन आम आदमी पार्टी जिंकणार हे नक्की.
केजरीवाल म्हणाले, काही लोक मोदी-मोदी.. अशा घोषणा देत आहेत. मी त्यांना आश्वासन देतो. तुम्ही या घोषणा अवश्य द्या. पण तुमच्या मुलांसाठी शाळा उघडणारा केजरीवालच आहे. तुम्हाला मोफत वीज देणारा केजरीवालच आहे. आमचं शत्रूत्व कुणाशीही नाही. एक दिवस आम्ही तुमची मनं जिंकणार आणि तुम्ही आमच्या पक्षात याल.
नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना रोजगार देण्याचं तसंच ३००० रुपये बेरोजगार भत्ता देण्याचं आश्वासनही अरविंद केजरीवाल यांनी दिलं. गुजरातमधील नवसारी येथे झालेल्या सभेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेदेखील या सभेला उपस्थित होते.
भगवंत मान यांना मागील महिन्यात भाजप समर्थकांनी काळे झेंडे दाखवले होते. केजरीवाल म्हणाले, आम्ही काळे झेंडे दाखवणाऱ्यांना आमचे भाऊ मानतो. पण आम्हाला विश्वास आहे, एक दिवस आम्ही त्यांचं मन नक्की जिंकू.
182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेसाठी डिसेंबर 2022 मध्ये मतदान होत आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात हे मतदान होईल. 8 डिसेंबर रोजी विधानसभेचा निकाल जाहीर होईल.