Gulabrao Patil : गुलाबराव पाटील संपला म्हणणाऱ्यांनी आता बघावं; गुलाबराव पाटील यांचा विरोधकांना टोला
Gulabrao Patil : आपल्या स्वागताला आलेली गर्दी ही जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत, असं ते म्हणाले. हे लोकांचं प्रेम मिळत आहे. मंत्री झाल्यावर आलोय. गेली अनेक वर्ष लोकांचं काम केलं. आज कोणावर काही बोलणार नाही. कोणाला उत्तर आज देण्याचा विषय नाही.
जळगाव: जळगावात (jalgaon) आज जल्लोषात स्वागत करण्यात आलं. हे शक्ती प्रदर्शन नाही, प्रेम आहे. मी काही लोकांना निमंत्रण दिलेलं नाही. लोकांनी आशीर्वाद दिले आहेत. आशीर्वाद सर्वात महत्त्वाचे असतात. लोकं म्हणत होते काही खरं नाहीये. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) संपला आहे. गुलाबराव पाटील संपला म्हणणाऱ्यांनी बघावं पाण्यात काय संपलंय आणि काय वाहिलंय, असा टोला राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना (opposition) लगावला. गुलाबराव पाटील आज जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांचं भव्य स्वागत केलं. हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला हजर होते. या शक्तीप्रदर्शनानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी विरोधकांना चांगलच फटकारलं. गुलाबराव पाटील यांची एक जाहीर सभाही होणार असल्याचं सांगितलं जातं. यावेळी ते कार्यकर्त्यांशी काय संवाद साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नजर टाकाल तिथे वाहनेच वाहने
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच जळगावमध्ये आले. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कोंढवळ येथे गुलाबराव पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी कोंढवळ ते पाळधीपर्यंत 60 किलो मीटरपर्यंतची भव्य कार रॅली काढण्यात आली. या कार रॅलीत शेकडो कार घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे दूरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा दिसत होत्या. जिकडे बघाल तिथे वाहनेच वाहने दिसत होती. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाब पुष्पांची उधळण करत गुलाबराव पाटील यांचं भव्य स्वागत केलं. गुलाबराव पाटीलही कारचं टप उघडून लोकांना हात दाखवून त्यांना अभिवादन करत होते. या भव्य रॅलीत हजारो कार्यकर्ते जमले होते. तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील बघ्यांनीही यावेळी प्रचंड गर्दी केली होती.
आज कोणावर बोलणार नाही
आपल्या स्वागताला आलेली गर्दी ही जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत, असं ते म्हणाले. हे लोकांचं प्रेम मिळत आहे. मंत्री झाल्यावर आलोय. गेली अनेक वर्ष लोकांचं काम केलं. आज कोणावर काही बोलणार नाही. कोणाला उत्तर आज देण्याचा विषय नाही. जनता सोबत आहे. गुलाबराव संपला म्हणणाऱ्यांनी पाहावंच, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंबाबत आदरच
दरम्यान, या आधी त्यांनी संजय शिरसाट यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली होती. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आजही आम्हला आदर आहे. तो आदर संजय शिरसाट यांनी व्यक्त केला असेल. शिंदे गटात आहोत हे लक्षात आल्यानंतर हे ट्विट त्यांनी डिलीट केलं असेल, असं ते म्हणाले. शिवसेना भवनाच्या धर्तीवर ठाणे आणि दादर परिसरात कार्यालय उभारले जाणार आहे. त्यातून सर्वसामान्य कार्यकर्ते शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले जातील, असंही त्यांनी सांगितलं.