‘संजय राऊत यांनी हलकट सारखं सांगितलं निघून जा, मग ठरवलं मंत्रिपद गेलं खड्ड्यात’, गुलाबराव पाटलांची जाहीर नाराजी, ठाकरेंवरही टीका
शेवटी नेत्यानेही कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे, पण आमचं म्हणणं उद्धव ठाकरेंनी ऐकून घेतलं नाही. माझ्या वैयक्तिक प्रश्न नव्हता पण पहिल्यांदा आमदार झालेल्यांची अडचण होती, म्हणून आमदारांनी उठाव केला, असं दावा पाटील यांनी केलाय.
जळगाव : शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर उद्धव ठाकतरे, संजय राऊत (Sanjay Raut), आदित्य ठाकरे यांनी पाटलांवर जोरदार टीकाही केली. त्या टीकेला आता गुलाबराव उत्तरं देताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी हलकट सारखं सांगितलं निघून जा, मग ठरवलं मंत्रिपद गेलं खड्ड्यात, अशा शब्दात पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय. शेवटी नेत्यानेही कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे, पण आमचं म्हणणं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ऐकून घेतलं नाही. माझ्या वैयक्तिक प्रश्न नव्हता पण पहिल्यांदा आमदार झालेल्यांची अडचण होती, म्हणून आमदारांनी उठाव केला, असं दावा पाटील यांनी केलाय.
संजय राऊतांची टीका, गुलाबरावांचं प्रत्युत्तर
गुलाबराव पाटलांनी यापूर्वीही उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हा 50 आमदारांनाही सोडलं, पण ते काही शरद पवारांना सोडायला तयार नाहीत, असं पाटील म्हणाले होते. तसच पाटील यांनी संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तरही दिलं होतं. ‘तो गुलाबराव पाटील कोण होता, हे माहीत आहे का? हे गुलाबराव जळगावात पानटपरीवर बसायचे. चुना लावायचे. त्यांना शिवसेनाप्रमुखांनी वर आणलं. उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं. त्यांनी आपल्याशी गद्दारी केली आहे. त्यांना पुन्हा टपरीवर नाही बसायला लावलं तर नाव बदलून ठेवा, अशा शब्दात राऊत यांनी पाटलांवर टीका केली होती. त्यावर पाटील यांनीही राऊतांना उत्तर दिलं होतं. ‘आमची परिस्थित काहीच नव्हती. तरीही आम्हाला सर्वकाही मिळालं. शिवसेनेच्या आशीर्वादाने मिळालं. पण त्यात आमचाही त्याग आहे. आम्ही आमच्या घरावर तुळशी पत्रं ठेवली. आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत. राऊत म्हणतात मला टपरीवर पाठवू. त्यांना चुना कसा लावता माहीत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा चुना लावू’, असा इशाराच पाटलांनी दिला होता.
‘राऊतांनी 35 लग्न लावून दाखवावीत’
आमच्या यशात शिवसेनेचा 80 टक्के वाटा आहे. पण 20 टक्के आमचाही मेहनत आहे. आम्ही घरादाराचा त्याग करून संघटना वाढवत होतो. राऊतांनी 47 डिग्री सेल्सिअस तापमानात जळगावात येऊन 35 लग्न लावावेत. मी त्यांना बहाद्दर म्हणेल. त्याकाळात आम्हीच लग्न लावत असतो, असंही पाटील म्हणाले होते.