“तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत” गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या एका विधानाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला नवा विषय मिळालाय. आदित्य ठाकरेंना त्यांनी टोला लगावला आहे.
मुंबई : शिवसेना आणि शिंदेगटात मोठ्या प्रमाणावर दुफळी निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दाव्या प्रतिदाव्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना विषय मिळत आहेत. असं असताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या (Gulabrao Patil) एका विधानाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला नवा विषय मिळालाय. आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) त्यांनी टोला लगावला आहे. ” 32 वर्षांचा पोरगा उठतो आणि आमच्यावर टीका करतो. अरे बाबा तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत”, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. अली बाबा और उसके चालीस चोर थे, तसं आम्हीही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत!, असंही ते म्हणालेत.
शिवसेनेतून बाहेर पडल्यावर काही लोक म्हणतात की तेरा क्या होगा कालिया? मात्र आहे आमचा गब्बर आहे”, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिलं.
“मी गुवाहाटी गेलो. तेव्हा पत्नी-मुलांचे फोन आले की परत या. पण आता परत येत नाही असं मी त्यांना ठणकावून सांगितलं. ज्याप्रमाणे अली बाबा के चालीस चोर थे तसं आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत! या शब्दात इतिहास लिहिला जाईल”, असंही पाटील म्हणालेत.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की, गेलेल्या आमदारांना परत बोलवा. असं केलं असतं तर सरकार वाचू शकलं असतं. मात्र त्यावेळी त्यांनी उडाले ते कावळे, राहिले ते मावळे अशी भाषा वापरण्यात आली. ते पटणारं नव्हतं, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी नाराजी व्यक्त केली.
35 वर्ष एकच झेंडा, एकच विचार आणि हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणारे आज आमच्यावर टीका करतात. या टीका करणाऱ्यांची लाज वाटते”, असा घणाघात संजय राऊतांनी केला होता. त्याला उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. “चहा पेक्षा किटली गरम”, असा टोला गुलाबराव पाटलांनी राऊतांना लगावला. “कोण आहेत संजय राऊत? आमदारांनी मतं दिली म्हणून ते खासदार झाले”, अशीदेखील टीका गुलाबराव पाटलांनी केली.