मुख्यमंत्री शिंदे ज्योतिष्याकडे गेले?, गुलाबराव पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं…
गुलाबराव पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. पाहा...
नंदुरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोतिष्याकडे (Astrologer) गेल्याची चर्चा आहे. त्यावर पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. मुख्यमंत्र्यांना भविष्य पाहण्याची गरज नाही. ते भविष्यकाराचं भविष्य सांगतील! कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) तिकडे गेले असतील पण शिंदेंना भविष्य बघण्याची गरज नाही.त्यांचं भविष्य उज्वलच आहे, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.
भविष्यकाराचं भविष्य सांगतील!, असं गुलाबराव पाटील म्हणालेत. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होतेय.
शिंदे जोतिष्याकडे गेले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक ज्योतिषाची भेट घेतल्याचीही चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सपत्नीक शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते नाशिकला गेले. मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील मिरगावच्या एका ज्योतिष्याकडे हात दाखवल्याची चर्चा आहे. त्यावर गुलाबराव पाटलांनी स्पष्टीकरण दिलंय.
दीपक केसरकर भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जातंय. त्यावरही गुलाबराव पाटील बोललेत. जे लोक हा दावा करत आहेत, त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नसल्याने अशा प्रकारचे आरोप होत असतात, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे जर महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची गरज भासली नसती.बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे महाराष्ट्रात तुम्हाला भेटायला आले असते, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
महापालिका निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलंय. महानगरपालिका निवडणूक एक प्रक्रिया असून तिला उशीर होऊ शकतो. त्यामुळे कुणी त्याचा चुकीचा अर्थ काढू नये, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.